
युरोप प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या कोरोना बाधितांमध्ये बदलत्या (नवीन) स्वरुपातील कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून येण्याच्या भीतीपोटी ८ जणांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते.
नागपूर : युरोपातून आलेल्या ८ पैकी तीन ते चार संशयित रुग्णांचे अहवाल पंधरा दिवसानंतरही प्राप्त न झाल्याने अखेर त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
युरोप प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या कोरोना बाधितांमध्ये बदलत्या (नवीन) स्वरुपातील कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून येण्याच्या भीतीपोटी ८ जणांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. यापैकी काही नमुन्याचा अहवाल आला होता. मात्र, उर्वरित तीन ते चार जणांचे अहवाल पंधरा दिवसानंतरही प्राप्त न झाल्याने काही संशयित संतप्त झाले होते. अखेर यांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. मंगळवारी (ता.१२) नव्याने ३३९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले, तर २४ तासांमध्ये ८ जण दगावले.
जिल्हात मंगळवारी नवीन रुग्णांमध्ये शहरातील २६४ तर ग्रामीण भागातील ७३ जण आढळून आले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख २ हजार १५३, तर ग्रामीण भागातील २५ हजार ७८६, जिल्ह्याबाहेरील ८१९ अशी एकूण १ लाख २८ हजार ७५८ रुग्णांवर पोहोचली आहे, तर शहरात दिवसभरात ३, ग्रामीणला ३, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ६८३, ग्रामीण ७१५, जिल्ह्याबाहेरील ६३७ अशी एकूण ४ हजार ३५ वर पोहोचली आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक! उडलीच नाही त्या तरुणाच्या स्वप्नांची पतंग; दुचाकीवरून जाताना घडली अंगावर...
रुग्णालयात आहेत ९९३ कोरोनाबाधित -
जिल्ह्यात दहा लाखांजवळ चाचण्यांची संख्या पोहोचली आहे. आज जिल्ह्यात ४ हजार ५३३ सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील ३ हजार ४५१ रुग्ण शहरातील तर १ हजार ८२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. एकूण रुग्णांतील ९९३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ३ हजार २०१ रुग्ण गृह विलगिकरणात आहेत.