मंगल कार्यालयात लग्न आणखी कठीण, व्यवस्थापनाला 'हे' लिहून द्यावे लागणार हमीपत्र

new rules for marriage in cultural hall in nagpur due to corona
new rules for marriage in cultural hall in nagpur due to corona

नागपूर : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेने मंगल कार्यालय, लॉन व्यवस्थापकांना शंभरपेक्षा जास्त वऱ्हाडी दिसणार नाहीत तसेच सर्व वऱ्हाडी मास्क घालतील, असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. मंगल कार्यालय, लॉनबाबतच्या अटी आणखी वाढविण्यात आल्याने लग्नाचा मुहूर्त ठरलेल्या वधू व वर पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे वऱ्हाडावर मंगल कार्यालय व्यवस्थापनावर आता लक्ष ठेवावे लागणार आहे. 

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज आदेश काढत मंगल कार्यालय, लॉनसाठी नवी नियमावली जाहीर केली. शहरात सामूहिक कार्यक्रमासोबतच मंगल कार्यालय, लॉनमध्ये नियमानुसार १०० पेक्षा जास्त वऱ्हाडी दिसणार नाही, याबाबत हमीपत्र झोन सहायक आयुक्तांना द्यावे लागणार आहे. एवढेच नव्हे एकही वऱ्हाडी मास्कशिवाय दिसणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आदेशही मंगल कार्यालय व्यवस्थापनाला दिले आहे. परिणामी मंगल कार्यालय, लॉन व्यवस्थापनही आता वर किंवा वधूपक्षाकडे या आदेशानुसार लग्न करण्याचा आग्रह धरणार आहे. या अटींचे पालन न केल्यास मंगल कार्यालय व्यवस्थापनावर १५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. अर्थात हा दंड मंगल कार्यालय व्यवस्थापन वऱ्हाडी मंडळीकडूनच वसूल करण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिकाही कार्यक्रमाचे आयोजक अर्थात वर किंवा वधू पक्षावर १० हजारांचा दंड ठोठावणार आहे. त्यामुळे आता मंगल कार्यालयातून लग्न करणे महागात पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी आयुक्तांनी मंगल कार्यालय किंवा लॉनमध्ये क्षमतेच्या २५ किंवा १०० व्यक्तींनाच प्रवेश राहणार असल्याचे आदेश काढले होते. निर्देशाचे उल्लंघन करताना पहिल्यांदा सापडल्यास १५ हजार रुपये, दुसऱ्यांदा सापडल्यास २५ हजार तर तिसऱ्यांदा सापडल्यास ५० हजार रुपयांचा दंड मंगल कार्यालय, लॉन संचालकांवर ठोठावण्यात येणार आहे. समारंभाचे आयोजक वर किंवा वधु पित्यावरही दहा हजारांचा दंड आकारण्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले होते. 

चार मंगल कार्यालयावर कारवाई -
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी दहाही झोनमधील ८८ सभागृहांची तपासणी केली. लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या चार मंगल कार्यालयावर कारवाई करीत ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरूनगर झोनमधील म्हाळगीनगर चौकातील एम्पोरियम हॉल, लकडगंज झोनमधील वर्धमाननगर येथील सातवचन लॉन, आसीनगर झोनमधील पॉवरग्रीड चौकातील जगत सेलिब्रेशन लॉन व मंगळवारी झोनमधील गोधनी रोडवरील गोविंद लॉनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी आढळून आले. 

कर्मचारी पॉझिटिव्ह, 'पिझ्झा हट' सिल - 
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हटमध्ये एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. महापालिकेने पुढील सात दिवसांसाठी पिझ्झा हट सिल केले. झोनहचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्यासह झोनल आरोग्य अधिकाऱ्याने कारवाई केली. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

असे आहेत नवे नियम - 

  • विहित संख्येपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याबाबत हमीपत्र 
  • लग्नात उपस्थित प्रत्येकजण मास्क घालणार, याबाबत हमीपत्र 
  • लग्नाच्या आठ दिवसांपूर्वी कार्यक्रमाची पूर्वसूचना देणे बंधनकारक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com