ये "फ्लेवर सॉलिड' हैं... 

मंगेश गोमासे 
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

फ्लेवर्स लिक्विड फॉर्ममध्ये असले की, त्याला स्थिरता नसते. त्यामुळे कोल्ड्रिंक्‍स उघडताच काही वेळात त्यातील फ्लेवर उडून गेल्याचे समजते. त्यामुळे जिभेवरची चवही जाते.

नागपूर  : आजकाल कुठल्याही पेयांमध्ये "फ्लेवर्स'ला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्ड्रिंक्‍स असो वा इतर पेय "फ्लेवर्स'शिवाय त्यात मजा नसते. "फ्लेवर्स' "लिक्विड फॉर्म'मध्ये असल्याने ते उघडल्यावर काहीच वेळात ऑक्‍सिजन उडाले की, त्यातील फ्लेवर्सही उडून जातात. त्यामुळे शीतपेय पिण्याची मजाच निघून जाते. पेयातील "फ्लेवर्स' कायम राहावे यासाठी त्याला "लिक्विड' फॉर्ममधून "सॉलिड'मध्ये करण्याचे भन्नाट संशोधन लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी संस्थेतील (एलआयटी) एम.टेक.च्या रोहित सांगोळकर याने केले आहे. 

अधिक माहितीसाठी - सांग सांग भोलानाथ किती वाघ आहे या जंगलात?

फ्लेवर्स लिक्विड फॉर्ममध्ये असले की, त्याला स्थिरता नसते. त्यामुळे कोल्ड्रिंक्‍स उघडताच काही वेळात त्यातील फ्लेवर उडून गेल्याचे समजते. त्यामुळे जिभेवरची चवही जाते. अशावेळी त्या पेयातून मन निघून जाते. इतरही वस्तूंमधील तो फ्लेवर बरेचदा कायम राहील याची शाश्‍वती नसते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून तो फ्लेवर "लिक्विड'ऐवजी "सॉलिड' फॉर्ममध्ये ठेवता येणे शक्‍य आहे.

एलआयटीच्या "फूड टेक्‍नॉलॉजी' विभागातील विद्यार्थ्यांने असे फ्लेवर्स सॉलिड फॉर्ममध्ये तयार केले आहे. हे "फ्लेवर्स' आवडत्या पदार्थात मिसळल्यावर बराच वेळपर्यंत त्याचा आस्वाद घेता येणे शक्‍य होईल. सध्या रोहितने ऑरेंज, मॅंगो, पेपरमिंट हे फ्लेवर्स तयार केले असून फुड इंडस्ट्रीमध्ये या फ्लेवर्सचा बऱ्याच प्रमाणात उपयोग करता येणे शक्‍य आहे. त्यामुळे नव्या उद्योजकांना एक नवे "स्टार्टअप' म्हणूनही सुरू करता येणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे संशोधनासाठी त्याला विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप कावडकर आणि प्राध्यापक डॉ. भारत भानवसे यांची मोलाची मदत केली. 

असे का घडले? - नवरेही म्हणताहेत, 'मुझे मेरी बिवी से बचाओ'

येथे होईल उपयोग

 रोहितने केलेल्या संशोधनातून तयार करण्यात आलेले फ्लेवर्स ज्युस, फ्रुट जॅम, स्व्कॅश, जेली आणि कोल्डिंक्‍ससारख्या पेयांमध्ये सहज टाकता येणे शक्‍य आहेत. विशेष म्हणजे घरी सरबत आणि ज्युसमध्ये या फ्लेवर्सचा वापर करता येऊ शकतो. दुसरीकडे नागपूरसह राज्यात अशा प्रकारचे हे पहिलेच आगळेवेगळे संशोधन असल्याने या संशोधनामुळे अनेक उद्योगांना चालना मिळण्याची शक्‍यता आहे. 

 

पहिल्यांदाच तयार
बाजारात लिक्विड फॉर्ममध्ये बऱ्याच प्रमाणात फ्लेवर्स मिळतात. मात्र, सॉलिड फॉर्ममध्ये अशाप्रकारचे फ्लेवर पहिल्यांदाच तयार करण्यात आले असल्याने उद्योगांमध्ये ते बरेच उपयोगाचे ठरणार आहे. 
-डॉ. दिलीप कावडकर, सहयोगी प्राध्यापक, एलआयटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Flavors Liquid Form