प्राचार्यांच्या दोषमुक्तीवरून नागपूर विद्यापीठात गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

जी. एस. कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. खंडाईत यांच्यावर बेकायदेशीर नियुक्तीचा तर गणेशपेठस्थित कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉर्ज अगस्टिन यांच्यावर अनियमिततेचा आरोप आहे.

नागपूर : अनियमिततेचे आरोप सिद्ध झाल्यानंतर दोन प्राचार्यांवर कारवाई करण्याऐवजी कुलगुरूंनी त्यांना दोषमुक्त जाहीर केल्याने मंगळवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत चांगलाच वाद झाला. 

जी. एस. कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. खंडाईत यांच्यावर बेकायदेशीर नियुक्तीचा तर गणेशपेठस्थित कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉर्ज अगस्टिन यांच्यावर अनियमिततेचा आरोप आहे. हे दोन्ही आरोप सिद्ध झाले असतानाही कुलगुरूंनी यांच्यावर कारवाई केली नाही. उलट दोषमुक्त केले. डॉ. खंडाईत यांच्या प्राचार्य नियुक्ती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती नियुक्त केली होती. या समितीने खंडाईत यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

हेही वाचा - Video : तीन हजार फुटांचे पत्र लिहिण्यास कारण की...

त्यामुळे राज्यपालांनी खंडाईत यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही डॉ. काणे यांनी खंडाईत यांच्यावर कारवाई करायचे सोडून त्यांच्या नियुक्तीमुळे दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराचे नुकसान झाले नसून, कुणीही बाधित नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे उचित नसल्याचा शेरा दिला. दुसऱ्या प्रकरणात कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉर्ज अगस्टिन यांनी शैक्षणिक सहलीला विद्यार्थ्यांना न नेता त्यांना गुणवाढ दिली होती. या प्रकरणात चौकशी केली असता अशी चुकीची गुणवाढ दिल्याच्या आरोपाखाली संबंधित शिक्षक व प्राचार्यांना दोषी ठरविण्यात आले. 

असे असतानाही अनेक वर्षांपासून या प्राचार्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप विष्णू चांगदे यांच्यासह काही सदस्यांनी केला. यावर बैठकीत चांगलेच घमासान झाले. विद्यापीठाने गेल्या काही वर्षात अनेक महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीर प्राचार्य भरती केल्याने सदस्यांनी कुलगुरूंना जाब विचारला. त्यावर प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about nagpur university