शाब्बाश पोरी! गरीब कुटुंबातून आलेल्या मुलीने आपल्या आर्टने जिंकले कित्येकांची मने... बघा व्हिडिओ

Nikita from Nagpur choose a different path after twelfth exam
Nikita from Nagpur choose a different path after twelfth exam

गुमगाव (जि. नागपूर) : तरुण म्हणजे सळसळती ऊर्जा... तरुण म्हणजे स्वप्नांचा ध्यास... रुळलेल्या वाटा सोडून वेगळी वाट धरून वाटचाल करणारी अनेक तरुण-तरुणी आत्मविश्‍वासाच्या बळावर कर्तृत्व सिद्ध करू पाहताहेत. अनेकांना त्यात भरभरून यशही मिळत आहे. परंतु, हे यश मिळवणं काही सोपं नाही. त्यासाठी लागते जिद्द आणि कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमता. याच जिद्दीच्या व क्षमतेच्या जोरावर एका गरीब कुटुंबातून आलेल्या मुलीने आपल्या आर्टने कित्येकांची मने जिंकली आहेत. 

उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खापरी पुनर्वसन येथील भारत डहाणे आणि ज्योती डहाणे यांची 23 वर्षीय मुलगी निकिताने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या क्षेत्राकडे न वळता वेगळी आणि नावीन्यपूर्ण वाट निवडली. चित्रकला विषयात लहानपणापासून आवड असलेल्या निकीताने याच "आर्ट'मधील कौशल्य आत्मसात करणे सुरू केले आहे. भविष्यामध्ये तिच्या अंगी असलेल्या कलेचा इतरांना फायदा होण्यासाठी आणि कुटुंबासाठी थोडेफार अर्थार्जन करण्यासाठी स्वतःच्या स्टुडिओचा श्रीगणेशा करायचा तिचा निर्धार आहे.

अभ्यासात हुशार आणि कुटुंबामध्ये मोठी असलेली निकिता लहानपणापासूनच रंगाच्या आणि चित्राच्या दुनियेत रमून जायची. श्रमदेवतेची पूजा बांधत जगत असताना आणि पोट भरण्यासाठी घाम गाळत असताना आई-वडिलांनी निकीताच्या हाती कौतुकाने पेन्सिल दिली. जिच्या हातात आपण पेन्सिल देतोय तिला कलाविश्‍व हाक देत आहे, असे तिच्या आई-वडिलांच्या ध्यानीमनी नसावे. निकीताने त्याच पेन्सिलने चित्रे रेखाटण्याचा श्रीगणेशा केला. जशीजशी निकिता मोठी होत गेली, तशीतशी चित्रकलेतील आवड वाढतच गेली. 

विविध कौशल्य केले आत्मसात

बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या निकीताने इतर कोणत्याही क्षेत्राचा विचार न करता आवडीच्या चित्रकलेतच शिक्षण आणि करिअर करण्याचा निश्‍चय केला. तिच्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयाला भक्कम पाठिंबा दिला. सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट येथून बी.एफ.ए. झालेली निकीताने कॅनव्हास पेंटिंग, ग्लास बॉटल आर्ट, ब्रॅंडिंग, विजिटिंग कार्ड, पोस्टर डिझाईन, लोगो डिझाईन, ब्रॉचर डिझाईन, पॉम्प्लेट डिझाईन, होर्डिंग्ज डिझाईन, सर्टिफिकेट डिझाईन, फोटोग्राफी क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केले आहेत. अवघे आकाश कवेत घ्यायची उर्मी असलेल्या निकीताच्या "आर्ट'ने सगळ्यांनाच मोहित केलेले आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून आता निकिताच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळत आहे.

भविष्यात स्वतःचा स्टुडिओ उघडायचा 
भविष्यात स्वतःचा स्टुडिओ उघडायचा आहे. यामध्ये आपल्या कलेचा इतरांना फायदा आणि यातून कुटुंबासाठी थोडेफार अर्थार्जन करायची आहे. यासाठी स्वतःचा घरूनच छोटेखानी ऑनलाईन व्यवसाय सुद्धा सुरू केला आहे. 
- निकीता डहाणे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com