राज्यपाल कोट्यातील उमेदवारीवरून नितीन राऊत का आहेत नाराज?

अतुल मेहेरे
Thursday, 3 December 2020

वनकर यांना उमेदवारी दिल्यावरून पक्षाच्या बैठकीत वाद झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्यांना उमेदवारी देताना पक्षात विचारविनिमय झाला नाही. कुणाचेही मत जाणून घेतले गेले नाही, असा आक्षेप डॉ. राऊत यांनी घेतला.

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कलावंत अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसतर्फे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत पक्षावर नाराज आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे डॉ. राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. 

हेही वाचा - यवतमाळच्या मातीतील शोले 'डाकू डब्बलसिंह' आता हिंदी, गुजराती अन् गोंडी भाषेतही

वनकर यांना उमेदवारी दिल्यावरून पक्षाच्या बैठकीत वाद झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्यांना उमेदवारी देताना पक्षात विचारविनिमय झाला नाही. कुणाचेही मत जाणून घेतले गेले नाही, असा आक्षेप डॉ. राऊत यांनी घेतला. कारण अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविली होती. काँग्रेसमधील अनुसूचित जमाती वर्गातील नेत्याला विधानपरिषदेवर संधी द्यायला हवी होती. मात्र, त्याऐवजी वनकरांना उमेदवारी दिल्याची तक्रार हायकमांडकडे करण्यात आली होती. पण त्याचीही दखल घेण्यात आली नव्हती. तेव्हापासूनच वनकर यांच्या उमेदवारीवरून पक्षात धुसफुस सुरू होती. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार अ‌ॅड. सरनाईक आघाडीवर

मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत डॉ. नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आता पक्षात नवीन वाद सुरू होतो की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात लढलेल्या व्यक्तीला राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या पदासाठी उमेदवारी देणे सर्वथा चुकीचे आहे, असा मतप्रवाह तेव्हाच उमटला होता. पण त्यावेळी उघडपणे कुणी नाराजी व्यक्त केली नव्हती. आता ऊर्जामंत्र्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे पक्षातील मंडळीसह सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin raut not happy about anirudh wankar candidature