यवतमाळच्या मातीतील शोले 'डाकू डब्बलसिंह' आता हिंदी, गुजराती अन् गोंडी भाषेतही

सूरज पाटील
Thursday, 3 December 2020

'डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह', या लघुपटाचे निर्माता दिग्दर्शक तथा लेखक आनंद कसंबे आहेत. चित्रीकरण यवतमाळपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बंद पडलेल्या दगड खाणीत झाले.

यवतमाळ : 'शोले' या चित्रपटाचे नाव येताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहतो तो गब्बरसिंग. गेल्या 1975मध्ये आलेल्या या चित्रपटाचे गारूड अजूनही कायम आहे. या चित्रपटातील डायलॉग आजही कित्येकांच्या तोंडपाठ आहेत. यवतमाळच्या मातीत 'डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह' या लघुपटाची कोविड जनजागृतीसाठी निर्मिती करण्यात आली. वऱ्हाडी भाषेचा तडका असलेल्या या मराठी लघुपटाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. त्यामुळे आता हिंदी, गुजराती व गोंडी या भाषांमध्येही या लघुपटाचे डबिंग केले जात आहे.

हेही वाचा - भरधाव ट्रकपासून वाचण्यासाठी दुसऱ्या ट्रकचा आडोसा घेतला, पण दुर्दैवाने झाला मृत्यू

'डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह', या लघुपटाचे निर्माता दिग्दर्शक तथा लेखक आनंद कसंबे आहेत. चित्रीकरण यवतमाळपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बंद पडलेल्या दगड खाणीत झाले. 'शोले' या चित्रपटातील गब्बर सिंह हा त्याच्या तीन साथीदारांना रामगडला लुटमार करण्यासाठी पाठवतो. मात्र, ते काही कारणाने रिकाम्या हाताने परत येतात. तेव्हा गब्बर सिंह त्यांच्यावर खूप चिडतो. 'इसकी सजा मिलेगी, जरूर मिलेगी', असा दम देणारा डॉयलॉग ठोकतो. हे दृश्‍य प्रत्येक रसिकांच्या मनात घर करून आहे. याच दृश्‍यावर आधारित अत्यंत चपखल बसणारा 'शोले' हा लघुपट यवतमाळसारख्या ग्रामीण भागात तयार झाला आहे.

हेही वाचा - अवनी वाघिणीच्या बछड्याला जंगलात सोडणार; एनटीसीएने दिली...

डाकू गब्बर सिंहचे वऱ्हाडी स्वरूप असलेला हा डब्बल सिंह कोरोना संकटापासून वाचविण्यासाठी जनजागृती करीत आहे. त्यातील सर्व कलावंत ग्रामीण व शहरी भागातील असून, काही तर झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यातील एक कलावंत सुधाकर धोंगडे नळदुरुस्तीचे काम करतात. जनार्दन राठोड हे शेतकरी आहेत. डाकू डब्बल सिंहची भूमिका पुसद येथील के. गणेशकुमार यांनी केली आहे. सांबाची भूमिका सामाजिक कार्यकर्ते घनश्‍याम नगराळे यांनी अतिशय लीलया केली आहे. कालियाची भूमिका गजानन वानखडे या झोपडपट्टीत राहणाऱ्या कलावंताने केली आहे. प्रशांत बनगीनवार, विलास पकडे, पंडित वानखडे, प्रशांत खोरगडे, वसंत उपगनलावार, पवन भारस्कर, प्रमोद पेंदोर, रूपेश रामटेके या कलावंतांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार अ‌ॅड. सरनाईक आघाडीवर

'डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह', या मराठी व बंजारा भाषेत असलेल्या लघुपटाला रसिकांनी चांगलीच पसंती दिली आहे. आठ मिनिटांचा लघुपट सात हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी बघितला आहे. कोरोनाच्या काळात लोकांच्या निखळ मनोरंजन करण्यासाठी 'आनंदयात्रा' ही हास्यमालिका निर्माण केली. रसिकांच्या मागणीमुळे हिंदी, गुजराती व गोंडी या भाषांतही डबिंग करण्यात येत आहे.
-आनंद कसंबे, निर्माता तथा लेखक, यवतमाळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daku dabbal singh short film dubbing in hindi gujrathi and gondi language