
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्रावरून राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या वादात उडी घेतली आहे.
नागपूर : राधाकृष्ण विखे पाटील यांचे कृत्य साऱ्या जगालाच माहिती आहे. अॅट्रॉसिटीच्या सर्वाधिक घटना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात असून त्याला आळा घालण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत म्हणाले.
हेही वाचा - भंडाऱ्यात राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर; विक्रमी ७८ व्यक्तींनी केले...
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्रावरून राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या वादात उडी घेतली आहे. डॉ. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र क्रांतिकारी आणि भविष्यातील काँग्रेसचा सोशल अजेंडा असल्याचे सांगितले. या पत्राद्वारे त्यांनी सरकारला फटकारले नाही तर मागास घटकांचे हित साधण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीयांना निधीचे समान वाटप, मागास घटकांना उद्योग, कारखाने, शासकीय कंत्राटात प्रतिनिधित्व, तंत्र शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रमातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जाळे तयार करावे, ही चतुःसूत्री सोनियांनी दिली असून त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सरकारकडून कार्य करण्याची ग्वाही राऊत यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळातील मागास घटकांवर अन्याय करणारे निर्णय रद्द करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Success Story: आता क्यूमॅथच्या सहाय्यानं हसत खेळत सोडवा गणिताचे प्रश्न; नागपूरच्या...
कोरोनावर नियंत्रण हे मोठे यश -
मागास घटकांच्या हिताला आघाडी सरकारचे प्राधान्य राहिले आहे. पण, संघ व भाजप सरकारने आघाडी सरकारचे अनेक निर्णय बदलले. काँग्रेसच्या भूमिकेची पुन्हा आठवण करून देण्यासाठी वडिलकीच्या आधारे सोनिया यांनी पत्र लिहिले आहे. आघाडीच्या १३ महिन्यांच्या कालावधींपैकी ८ महिने कोरोनाच्या कठीण काळात गेले. विकास कामांवरही त्याचा निश्चितच परिणाम झाला आहे. पण, कोरोनावरील नियंत्रण हे देखील राज्य सरकारचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले.