भंडाऱ्यात राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर; विक्रमी ७८ व्यक्तींनी केले प्लाझ्मा दान

भंडारा : प्लाझ्मा दानदात्यांसोबत अधिकारी व डॉक्‍टर.
भंडारा : प्लाझ्मा दानदात्यांसोबत अधिकारी व डॉक्‍टर.

भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १८ जण प्लाझ्मा दानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे एकूण ७८ व्यक्तींनी आपले प्लाझ्मा दान केले आहे.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या शिबिरात जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रक्तदान केले; तर अपर जिल्हाधिकारी घनश्‍याम भूगावकर यांनी प्लाझ्मा दान केला. हा प्लाझ्मा अनेक कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३० व्यक्तींनी रक्तदान केले. प्लाझ्मा दान करणाऱ्यांमध्ये पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशंसा केली. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत १४७ अधिकारी-कर्मचारी व व्यक्तींनी नोंदणी केली होती. आरबीडी व ऍन्टीबॉडी तपासणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्लाझ्मा दान शिबिर आयोजित केले. या शिबिरात ६० व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. कोरोना रुग्णांच्या संख्येत सध्या घट होत असली; तरी काही रुग्ण गंभीर परिस्थितीतही आहेत. अशा रुग्णांना अन्य औषधोपचारासह प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांमध्ये उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढत असल्याचे दिसते. म्हणूनच कोरोनाबाधित होऊन गेलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा कोरोनाबाधितांना दिला जात आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांना आवाहन केले जात आहे. मात्र प्रत्येकच बाधित होऊन गेलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा परिणामकारक ठरेल, याची शाश्वती नसल्याने प्रारंभी अशा व्यक्तींच्या शरीरातील आरबीडी व ऍन्टीबॉडीची तपासणी केली जाते. एका विशिष्ट पातळीपर्यंत याचे प्रमाण आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीचा प्लाझ्मा उपयुक्त ठरू शकतो की नाही, याचे निदान केले जाते.

दरम्यान प्लाझ्मा लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या कल्पनेतून प्लाझ्मा दान शिबिराची संकल्पना पुढे आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि लाईफ लाइन रक्तपेढी नागपूर यांच्या वतीने भंडाऱ्यात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाबाधित होऊन बरे झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून हे शिबिर घेण्यात आले. या व्यतिरिक्त अन्य लोकांच्याही ऍन्टीबॉडीची तपासणी करण्यात आली. शिबिरात पहिल्या दिवशी ११६, दुसऱ्या दिवशी सहा तर, तिसऱ्या दिवशी २५ जणांनी तपासणीसाठी नोंदणी केली. यातील पात्र ठरलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. विशेष म्हणजे हा दान केलेला प्लाझ्मा भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरला जाणार आहे.

राज्यातील सर्वात मोठे शिबिर

प्लाझ्मा मिळावा म्हणून नागपूरच्या घिरट्या घालणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या शिबिराचे आयोजन नक्कीच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना दिलासा ठरेल. विशेष म्हणजे, शिबिर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर असल्याचे लाइफलाइन ब्लड बॅंकेचे डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले. शिबिरासाठी लाइफ लाइन ब्लड बॅंक नागपूरच्या चमूने गेली तीन दिवस मेहनत घेतली.
 

गरजू रुग्णांना प्लाझ्मा मोफत देणार
कोविड-१९च्या रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या प्लाझ्मा दान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हा प्लाझ्मा शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे आणखी प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस असून कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावा.
- संदीप कदम
जिल्हाधिकारी भंडारा.



(संपादन : दुलिराम रहांगडाले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com