ना टॉयलेट-बाथरूम, ना चेंजिंग रूम! कसे घडणार खेळाडू? हिंगणा तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था

नरेंद्र चोरे 
Thursday, 14 January 2021

जवळपास दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या संकुलात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोनशे मीटरचा रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन हॉल, संरक्षण भिंत, मैदानाचे सपाटीकरण, ड्रेनेज, विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, टॉयलेट-बाथरूम, चेंजिंग रूम इत्यादी सुविधा होणार होत्या.

नागपूर : गावपातळीवरील खेळाडूंना सराव करता यावा आणि येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने राज्य शासनाने ठिकठिकाणी तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र लालफितशाही, शासनाचे उदासीन धोरण व निधीच्या कमतरतेमुळे अनेक संकुलाची दुरावस्था झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका क्रीडा संकुल याचे उत्तम उदाहरण आहे. येथे खेळाडूंसाठी मैदान तर दूर, साधी टॉयलेट-बाथरूम व चेंजिंग रूमची सोयदेखील नाही. अशा दयनीय स्थितीत खेळाडू सराव कसे करतील, याचा शासनपातळीवर विचार होण्याची आवश्यकता आहे.

जवळपास दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या संकुलात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोनशे मीटरचा रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन हॉल, संरक्षण भिंत, मैदानाचे सपाटीकरण, ड्रेनेज, विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, टॉयलेट-बाथरूम, चेंजिंग रूम इत्यादी सुविधा होणार होत्या. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने दहा वर्षे होऊनही हे संकुल पूर्ण झाले नाही. 

अधिक वाचा -  पानिपतावर जिंकण्यासाठी नव्हे तर तत्वासाठी लढले मराठे; पहिल्यांदाच उघड झालीत धारातीर्थी पडलेल्या सरदारांची नावं 

वीज, पिण्याचे पाणी, टॉयलेट-बाथरूम, चेंजिंग रूमसारख्या मूलभूत सोयीसुविधांअभावी खेळाडूंची विशेषतः महिला खेळाडूंची मोठी गोची होत आहे. आजच्या घडीला हिंगणा तालुक्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणारे अनेक दर्जेदार युवा ऍथलिट्स आहेत. त्यांना व पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना सरावासाठी चांगल्या मैदानाची नितांत आवश्यकता आहे. मात्र संकुलात अनुकूल वातावरण नसल्यामुळे इच्छा असूनही मुली सरावासाठी येऊ शकत नाही. त्यामुळे नाइलाजाने दुसरीकडे प्रॅक्टिससाठी जावे लागत आहे.

संकुलाच्या समस्या व अडचणी एवढ्यावरच थांबत नाहीत. विद्युत मीटर आहे तर विजेचे खांब नाही. आणि बोअरवेल आहे, पण पाणी नाही. बोअरवेलमध्ये मातीगोटे टाकून ठेवले आहेत. केवळ नावापुरती एक रूम आहे. तेथून अनेकवेळा महागडे क्रीडा साहित्य चोरीला गेले. शिवाय मोकळे मैदान असल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी दारू पार्ट्या रंगत असल्याची माहिती नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एकाने दिली. तसेच संकुलात तयार होऊ घातलेल्या रनिंग ट्रॅकसाठी कित्येक दिवसांपासून मुरूम येऊन पडला आहे. पण हे कामही सध्या कासवगतीने सुरू आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे एकूणच या संकुलाची दयनीय अवस्था झालेली आहे.

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

संकुलासाठी आधी २५ लाख रुपये यायचे. त्यानंतर हा निधी एक कोटी करण्यात आला. मुळात निधीचीच कमतरता जाणवत आहे. एकावेळी पुरेसा निधी मिळाला असता तर संकुलातील उरलेली कामे लवकर पूर्ण होऊ शकली असती. सद्यःस्थितीत पाच कोटींची आवश्यकता आहे. आम्ही तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही."
-आशा मेश्राम, 
तालुका क्रीडा अधिकारी 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Toilet and Bathroom in Sports stadium in Hingna Nagpur