esakal | धक्कादायक! नागपुरातील मनपा रुग्णालयांत व्हेंटिलेटरच नाहीत; शहरी आरोग्याची दैना;‘आयसीयू’ बेडचाही अभाव

बोलून बातमी शोधा

No ventilators available in Nagpur NMC hospitals in Nagpur

यावर्षी कोरोनाची त्सुनामी आली. शहरात सव्वादोन लाखावर कोरोनाबाधितांची संख्या झाली. जिल्ह्यात पाऊणे तीन लाखांजवळ बाधितांची संख्या गेली. शहरात साडेतीन हजार नागरिकांचा मृत्यू झाला.

धक्कादायक! नागपुरातील मनपा रुग्णालयांत व्हेंटिलेटरच नाहीत; शहरी आरोग्याची दैना;‘आयसीयू’ बेडचाही अभाव
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : तीस लाख लोकसंख्या असलेल्या मेट्रोसीटीत कधी स्क्रब टायफस तर कधी डेंगी तर कधी स्वाईन फ्लूसारख्या साथ आजारांचा प्रकोप होते. शहरी आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र ३० लाखाच्या लोकसंख्येच्या शहरात महापालिकेच्या एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. विशेष असे की, व्हेंटिलेटर हाताळणारी यंत्रणा देखील नाही, अशी दयनीय अवस्था महापालिकेच्या रुग्णालयांत दिसून येते.

यावर्षी कोरोनाची त्सुनामी आली. शहरात सव्वादोन लाखावर कोरोनाबाधितांची संख्या झाली. जिल्ह्यात पाऊणे तीन लाखांजवळ बाधितांची संख्या गेली. शहरात साडेतीन हजार नागरिकांचा मृत्यू झाला. शहराची ही अवस्था म्हणजे शहराच्या रुग्णव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगणारी आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही शहरात एकही सुसज्ज असे रुग्णालय तयार करण्यात आले नाही. 

धक्कादायक प्रकार! तब्बल ९ तास फुटपाथवर पडून होता पॉझिटिव्ह रुग्ण; अखेर हॉस्पिटलला आली जाग

परिणामी साथ आजारांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका नापास झाली आहे. महापालिकेत तज्ज्ञ डॉक्‍टर नाहीत. सद्या केवळ कोविड केअर सेंटर म्हणून महापालिकेची रुग्णालये वापरली जात आहेत. ऑक्सिजनयुक्त खाटा आहेत,हेच या रुग्णालयांचे यश आहे. कोणत्याही साथ आजाराचा शिरकाव झाल्यास केवळ जनजागरण करणाऱ्या एजन्सीचे काम महापालिकेकडून होते.

अतिदक्षता विभागही नाही 

महापालिकेच्या एकाही रुग्णालयात अतिदक्षता विभागही कधीच तयार करता आला नाही. फेब्रुवारी २०२० पर्यंत ३० लोकसंख्या असलेल्या शहरात महापालिकेच्या १३० खाटा होत्या. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य यंत्रणा ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न केले. १३० खाटांवरून ४६० खाटा केल्या. मात्र त्यांना शहरातील लोकप्रतिनिधींकडूनच प्रचंड विरोध झाला आणि त्यांची रवानगी दुसऱ्या विभागात झाली. दुसऱ्या लाटेत मात्र आरोग्य यंत्रणेचे बारा वाजले.

दोन रुग्णालये कागदावरच 

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी शहरात पूर्व आणि पश्‍चिम नागपुरात बीओटी तत्त्वावर दोन अद्ययावत रुग्णालये तयार करण्याचा संकल्प सोडला होता. परंतु यानंतरच्या महापालिका आयुक्तांनी नवीन रुग्णालयांच्या उभारणीच्या विषयाला हात घातला नाही. हा विषय कधी महापालिकेच्या सभेतही गाजला नाही. पंधरा वर्षांपासून एकाही रुग्णालयात अद्ययावत असे एक्‍स-रे मशिन नाही, सोनोग्राफीची सोय नाही, सीटी स्कॅन तर नाहीच नाही. 

भयंकर प्रकार! कोरोनाचे अर्धवट जळालेले मृतदेह...

एमआरआय यंत्राचा तर विचारच करणे शक्‍य नाही. अशा समस्यांच्या विळख्यात पालिकेची आरोग्यसेवा सापडली आहे. मेयो, मेडिकलच्या भरवशावर शहराचे आरोग्य सांभाळले जाते. तर पुढाऱ्यांना उपयोगात नसलेल्या मेट्रो आणि बिनकामाचे रस्ते उभारण्यात रस आहे, असे समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तरमारे यांनी म्हटले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ