
उमरेड (जि.नागपूर) : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात सुरू असलेले देशव्यापी लॉकडाउन आणि देशातील हजारांच्या घरात पोचलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता शासनाने आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे पाऊल उचलले आहे. आता थेट मोबाईल पोस्ट ऑफिस गावकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे आर्थिक व्यवहार पार पाडतील, अशी सोय केली आहे.
"सोशल डिस्टनसिंग'चा वापर
सोमवारी (ता.13) दुपारी बाराच्या दरम्यान स्थानिक संताजी जगनाडे चौकात एक लाल रंगांच्या वाहनात चालते-फिरते पोस्ट ऑफिस नजरेस पडले. त्या वाहनांच्या बाहेर चुन्याने आखलेल्या वर्तुळांमध्ये उभे असलेले पोस्टाचे व अन्य बॅंकांचे खातेधारक त्यांच्या खात्यातील रोख उचल करण्यासाठी रांगेत उभे होते आणि त्यांना पैसेही दिले जात होते.
रोख रकमेची सुलभ उचल
यावेळी भारतीस पोस्टचे प्रवर अधीक्षक श्री. टी. शर्मा, नागपूर ग्रामीणचे दिलीप खाडे, सहायक अधीक्षक पवनी उपविभागाचे प्रल्हाद शास्त्रकर, स्थानिक पोस्ट कर्मचारी मंगेश पडोळे, नरेंद्र दहीलकर आदी मंडळी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोरोना वैश्विक आपत्तीच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम तुटू नये म्हणून ग्रामीण भागातील प्रत्येक बॅंक खातेधारकाला मग त्या खातेधारकाचे खाते कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत का असेना, आधार लिंक असलेले समस्त खातेधारक गावातील पोस्ट ऑफिस किंवा या मोबाईल पोस्ट ऑफिसमधून नि:शुल्क आर्थिक व्यवहार करू शकतील. पेन्शन, रोख रकमेची उचल व अन्य व्यवहार सुलभरीत्या करता येईल अशी माहिती पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या चालत्या-फिरत्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांना त्यांच्या जनधन खात्यात जमा झालेली रक्कमसुद्धा काढता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातील पैसे काढून आर्थिक अडचण सोडविण्यास मदत होईल.
कोरोनाशी लढा देणे सुखकर होईल
ग्रामीण भागातील जनतेला बॅंकांचे व्यवहार करण्यासाठी शहरातील बॅंकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा बॅंकांमध्ये गर्दी होते व नागरिकांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी प्रस्तुत मोबाईल पोस्ट ऑफिस आता थेट गावकऱ्यांच्या दारात जाईल आणि त्यांना निःशुल्क बॅंकिंग सेवा पुरविली जाईल. त्यामुळे कोरोनाशी लढा देणे सुखकर होईल.
- टी. शर्मा, प्रवर अधीक्षक, डाकघर नागपूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.