महाआघाडीत जोश : झेंडा फडकावयाचा असेल तर काँग्रेसला घ्यावे लागणार थोडे नमते

राजेश चरपे
Saturday, 5 December 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर त्याही पुढे जाऊन भाजप विरोधात यापुढे महाआघाडीनेच लढू अशी घोषणाही केली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाआघाडीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे एकत्रित निवडणूक लढण्याला आणखी बळ मिळणार आहे.

नागपूर : पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे. आता नागपूर महापालिका काबीज करण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, पदवीधरमध्ये दाखवलेली एकी आणि महाआघाडी कायम राहणे यासाठी आवश्यक आहे.

सुमारे पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत भाजपचे बंपर १०८ नगरसेवक निवडून आले तर काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यांचे अवघे १८ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर नगरसेवक किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे यांनी शिवसेनेची लाज राखली. चार नगरसेवकांचा प्रभाग यास प्रामुख्याने कारणीभूत ठरला.

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

भाजपची सत्ता जाताच महाआघाडीने सर्वप्रथम महानगरपालिका निवडणुकीचा चारचा एक प्रभागाचा निर्णय बदलवला. त्यामुळे छोटेछोटे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर त्याही पुढे जाऊन भाजप विरोधात यापुढे महाआघाडीनेच लढू अशी घोषणाही केली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाआघाडीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे एकत्रित निवडणूक लढण्याला आणखी बळ मिळणार आहे.

मोदी-शहाविरोधात रोष?

केंद्रातील मोदी-शहा यांच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये रोष वाढत चालला आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला कुठल्याही परिस्थिती भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही. त्यामुळे वर्षभरावर येऊन ठेपलेली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच महाआघाडीला मोट बांधावी लागणार आहे.

सविस्तर वाचा - घरी मोठ्या प्रमाणावर जमलेले शेणखत फेकण्यासाठी गेली महिला; मात्र, वाघाने घेतला नरडीचा घोट

जागा वाटपासाठी कस लागणार

महापालिकेत जागा वाटप करताना महाआघाडीचा खरा कस लागणार आहे. कोणाला किती आणि कुठला भाग सोडायचा यावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे काँग्रेस सहजासहजी जागा सोडण्यास तयार होणार नाही. परंतु, महापालिकेत झेंडा फडकावयाचा असेल तर काँग्रेसला थोडे नमते घ्यावे लागणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक गट आणि नेते आहेत. त्यांच्यात आधी ऐक्य घडवून आणावे लागले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Nagpur Municipal Corporation is the focus of the alliance