पालकांनो आता ऑनलाइन वर्गातही तुमच्या मुलांवर ठेवा ‘वॉच'; कसा ते वाचा

मंगेश गोमासे 
Monday, 7 September 2020

देशात मार्च महिन्यापासून टाळेबंदी होती. मात्र, शाळा व महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली.

नागपूर : ऑनलाइन शिक्षण सुरू असताना अनेकदा विद्यार्थी गेम वा चॅटिंग यासारख्या प्रकारात मग्न राहतात. यात त्यांचे वर्गाकडे दुर्लक्ष होते. मात्र, आता ऑनलाइन वर्गातील विद्यार्थ्यांवर वॉच ठेवता येणे शक्य आहे. विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कोडींगच्या माध्यमातून एक संकल्पना मांडून हे शक्य केले आहे.

देशात मार्च महिन्यापासून टाळेबंदी होती. मात्र, शाळा व महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली. ऑनलाइन लेक्चर, वर्कशिट्स, व्हिडिओच्या माध्यमांतून शिकवण्यास सुरुवात केली. शाळा व महाविद्यालयांचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले. 

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष

मात्र, विद्यार्थी वर्ग सुरू असताना इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देतात. यात गेम खेळणे, मित्रांशी चॅट करणे आणि पॉर्न बघणे असे त्यांचे उद्योग सुरू असतात. या समस्येवर तोडगा म्हणून सौम्या गांधी, रितिक अग्रवाल, सुरभी अग्रवाल, आयुष फाडीया, कनिष्क सोनी, प्रनिथ कोर्थीवाडा या तरुणांनी कोडींगचा उपयोग करीत, ऑनलाइन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील दहा भाव टिपून अभ्यासादरम्यान ते नेमके काय करीत आहेत याचा अंदाज बांधणे शक्य केले आहे. 

याशिवाय ओठांची हालचाल लक्षात घेऊनही विद्यार्थी काय करतो आहे हेही माहिती करता येणे शक्य होणार आहे. ही बाब शिक्षकाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. विशेष म्हणजे या सहाही युवकांनी कॉम्पुटर सायन्स ॲन्ड इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना या संकल्पनेला मूर्त रूप देण्यास सुरुवात केली होती.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

हॅकेथॉनमध्ये प्रथम पुरस्कार

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने १ ते ३ ऑगस्टदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन केले होते. या आयोजनात सादर करण्यात आलेल्या विविध संकल्पनेत सौम्या गांधी, रितिक अग्रवाल, सुरभी अग्रवाल, आयुष फाडीया, कनिष्क सोनी, प्रनिथ कोर्थीवाडा या तरुणांनी सादर केलेली संकल्पना उत्कृष्ट ठरली होती. यासाठी त्यांना एक लाखाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now parents can watch their children during their online classes