जेईई मेन्स परीक्षा कधी? 'एनटीए'कडून अद्याप घोषणा नाहीच

मंगेश गोमासे
Wednesday, 18 November 2020

नॅशनल टेस्टींग एजन्सीने अभ्यासक्रमात कपात करण्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. ही घोषणा न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडणार आहे. नेमके काय वाचावे, कोणत्या विषयाला अधिक महत्त्व द्यावे हे माहिती होणे कठीण झाले आहे. 

नागपूर : नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे (एनएटी)जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेबाबत अद्याप कुठल्याच प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे परीक्षेचे प्रारुप, अभ्यासक्रम आणि इतर माहिती अभावी विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. विशेष म्हणजे जानवारीत होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक ऑगस्ट महिन्यात नोटीफिकेशनद्वारे घोषीत करण्यात येते.  

हेही वाचा -  पशुपक्षी वनात केला दीपोत्सव साजरा; वनविभाग व पीपल फॉर ऍनिमल्सचा उपक्रम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी जेईई मेन्स आणि त्यानंतर जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षा लांबल्या. दीड महिन्यांपूर्वी या परीक्षा होऊन त्यांच्या निकालाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आयआयटीचे प्रवेश लांबले. राज्यात अद्याप अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आलेली नाही. परीक्षांचे समिकरण बिघडल्यानेच राज्यासह सीबीएससी बोर्डानेही अभ्यासक्रमात कपात करण्याचे ठरविले. त्यानुसार सीबीएसईच्या नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र, नॅशनल टेस्टींग एजन्सीने अभ्यासक्रमात कपात करण्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. ही घोषणा न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडणार आहे. नेमके काय वाचावे, कोणत्या विषयाला अधिक महत्त्व द्यावे हे माहिती होणे कठीण झाले आहे. 

हेही वाचा - नागपुरात हत्याकांडांचे सत्र; गेल्या ३ दिवसात ४ हत्या; यशोधरानगरात युवकाचा खून 

विशेष म्हणजे जेईई मेन्स वर्षातून दोनवेळा घेण्यात येतात. यापैकी एक परीक्षा जानेवारी, तर दुसरी एप्रिल महिन्यात होते. दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात. ज्या परीक्षेत जास्त गुण त्या परीक्षेचा निकाल ग्राह्य धरण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या प्रभावाने पुढल्या वर्षी केवळ एक परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतरच होण्याची शक्यता आहे. अद्याप 'एनएटी'ने तशी घोषणा केली नसली तरी याबाबत बरीच चर्चा असल्याचे समजते. त्यामुळे जानेवारी महिन्यातील परीक्षेची पालक आणि विद्यार्थी वाट पाहत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NTA not yet declared jee mains exam date