
प्राप्त माहितीनुसार, मनीषा (३५) आणि निलेश यांच्यात काही कारणातून घरगुती वाद सुरू होता. या वादातून मनीषा या आपल्या माहेरी अजनी हद्दीतील बिनकर वसाहत येथे राहायला आल्या.
नागपूर ः पत्नीने सोबत राहायला नकार देत माहेर गाठले. त्यामुळे पतीने सासरी जाऊन धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर पतीने पत्नीच्या भावाची आणि वहिनीच्या दुचाकीवर राग काढत त्या पेटविल्या. ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. निलेश योगेश हेडाऊ (४०) रा. तकीया वॉर्ड, भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनीषा (३५) आणि निलेश यांच्यात काही कारणातून घरगुती वाद सुरू होता. या वादातून मनीषा या आपल्या माहेरी अजनी हद्दीतील बिनकर वसाहत येथे राहायला आल्या. आरोपी निलेश हा शनिवारी मनिषाला सोबत नेण्यासाठी सासरी आला. माझ्या सोबत राहा असे पत्नीला म्हटले पण तिने नकार दिला.
या कारणातून दोघांत वाद झाला. संतापलेल्या निलेशने मनिषाच्या भावाची पल्सर आणि त्याच्या वहिनीची मोपेड दुचाकी पेटवून दिली. याप्रकरणी मनीषा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
माचीस न दिल्याने ब्लेडने हल्ला
सिगारेट पिण्यासाठी माचीस न दिल्यामुळे दोघांत वाद झाला आणि एकमेकांना शिवीगाळ केली. एका आरोपीने ब्लेडने दुसऱ्या युवकाच्या गालावर वार करून जखमी केले. ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
अमीर बशीर शेख (३१) रा. मिनिमाता नगर हे छावणी पोलीस चौकी समोरील पानठेल्यावर सिगरेट पिण्यासाठी गेला होता. पानठेला बंद असल्याने तेथे उभा असलेला आरोपी शुभम मांढरे याला माचीस मागितली. त्याने माचीस नाही असे म्हटले. यावरून दोघांत बाचाबाची झाली. आरोपी शुभमने आपल्या जवळील बोटाच्या नखात असलेली ब्लेडने अमीरच्या गालावर वार करून गाल चिरला. याप्रकरणी अमीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ