पाणी फेकण्याचा मुद्द्यातून झाला वाद; ७० वर्षीय वृद्धाने केला २२ वर्षीय युवकावर कुऱ्हाडीने हल्ला

विजयकुमार राऊत 
Sunday, 22 November 2020

पाणी फेकण्याच्या वादातून ७० वर्षीय वृद्धाने कुऱ्हाडीने वार करून २२ वर्षीय युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात युवकाच्या हाताचा अंगठा तुटला. ही थरारक घटना शनिवारी सकाळी नवीन कामठीतील लिहीगाव येथे घडली.

नागपूर ः नागपूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटना वाढतच  चालल्या आहे. शुल्लक कारणातून कोण कोणावर हल्ला करेल काहीही सांगता येत नाही. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे.  

पाणी फेकण्याच्या वादातून ७० वर्षीय वृद्धाने कुऱ्हाडीने वार करून २२ वर्षीय युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात युवकाच्या हाताचा अंगठा तुटला. ही थरारक घटना शनिवारी सकाळी नवीन कामठीतील लिहीगाव येथे घडली. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून वृद्धाला अटक केली आहे. तुळशीराम तेमुजी मेश्राम (वय ७० ),असे वृद्धाचे तर सुशांत बोरकर (वय २२ ),असे जखमी युवकाचे नाव आहे.

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

सुशांत व त्याचे मित्र शनिवारी सकाळी लिहीगावमधील ग्रीन जीममध्ये व्यायाम करीत होते. यावेळी तुळशीराम यांनी पाणी फेकले. पाणी सुशांत याच्या अंगावर पडले. सुशांत याने तुळशीराम यांना विचारणा केली. तुळशीराम यांनी वाद घातला. त्यानंतर काही वेळाने तुळशीराम हे कुऱ्हाड घेऊन आले. त्यांनी सुशांत याच्यावर हल्ला केला. यात सुशांत याच्या हाताचा अंगठा तुटला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तुळशीराम यांना अटक केली.

लुटारुला अटक, दोघे ताब्यात

 मारहाण करून शुभम हरणे या युवकाकडील चार हजारांची रोख हिसकावणाऱ्या लुटारुला नवीन कामठी पोलिसांनी अटक केली. हर्ष युवराज इंगोले (वय १९,रा. भालेश्वरनगर ),असे अटकेतील युवकाचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तर रणजित हा फरार आहे. 

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

हर्ष व रणजित दोघे कुख्यात गुन्हेगार आहेत. काही दिवसांपूर्वी ऑटोने आलेल्या चौघांनी मारहाण करून शुभम याच्याकडील रोख हिसकावली. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी पोलिसांनी ऑटो क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी हर्ष याला अटक करून दोघांना ताब्यात घेतले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old man attacked on young boy In Nagpur district