ऑनलाइन जुगार चालविणे पडले महागात, पडल्या बेडया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

 नागपुरात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या सदस्यांची संख्या मोठी असून त्यातही तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पुढे आली असून ही पालकांची चिंता वाढविणारी बाब आहे.

नागपूर : मोबाईल ऍपवरून सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा कपिलनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ऍपवरून लुडो खेळात प्रत्यक्ष पैसे लावून जुगार खेळविला जात होता. ऍप संचालित करणाऱ्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. गुरुप्रितसिंग अमरजीतसिंग मथारू (31) रा. शेंडेनगर, टेका नाका असे आरोपीचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोन पंचांना सोबत घेऊन गुरुप्रितसिंगच्या घरावर छापा टाकला. यावेळी तो मोबाईलवरून गेम ऑपरेट करीत असल्याचे दिसून आले. मोबाईल तपासला असता "लुडो प्ले ऍण्ड वीन' ऍपवरून प्रत्यक्ष जुगार खेळला जात असल्याचे निष्पन्न झाले. नागपुरात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या सदस्यांची संख्या मोठी असून त्यातही तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पुढे आली असून ही पालकांची चिंता वाढविणारी बाब आहे.

पोलिसांनी गुरुप्रितसिंगला अटक करीत त्याच्याकडून मोबाईल आणि ऍपला लिंक असणारे पंजाब नॅशनल बॅंकेचे पासबुक जप्त केले आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक दिलीप रहाटे, भारत जाधव, रूपाली साळुंके, हवालदार गणेश बरडे, शिपाई आसिफ, प्रवीण मरापे, विजय वायदुडे, राहुल नागदवते यांचा समावेश होता.

वाचा- कोरोनाब्लास्ट : उपराजधानीत एकाच दिवशी 47 बाधित

असा चालतो खेळ
आरोपीने व्हॉट्‌सऍपवर लुडो प्ले ऍण्ड विन नावाचा ग्रुप तयार केला आहे. अनेकांना जोडून घेतले आहे. ग्रुपमेंबरना या खेळात सहभागी होता येते. त्यासाठी आधी पैसे भरून ऑनलाइन मेंबर व्हावे लागते. त्यानंतर खेळण्यासाठी आयडी उपलब्ध होते. खेळणाऱ्यांना गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे जोडून पैसे स्वीकारले जाते. पैसे मिळताच स्पर्धकांना परस्परांचे मोबाईल नंबर दिले जातात. त्याच्या मदतीने मोबाईलवरूनच आणि आहे त्या ठिकाणाहून खेळविण्यात येतो. जिंकणारा व्यक्ती स्क्रिन शॉट काढून गुरुप्रितच्या मोबाईलवर पाठवितो. त्यानंतर गुरुप्रित डिपॉजिट झालेल्या दोन्ही स्पर्धकांच्या रकमेतून 10 टक्के रक्कम वजा करून जिंकणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात यूपीआयद्वारे ऑनलाइन ट्रान्सफर करतो. प्राप्त माहितीनुसार गुरुप्रित हा केवळ एक एजंट आहे. त्याच्यासारखे आणखीही एजंट शहरात असून ऑनलाइन जुगार खेळवितात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested for running illigal online lottery