57 वर्षांपूर्वी रंगला होता व्हीसीएवर रंगला "वन मॅन शो' 

नरेंद्र चोरे
मंगळवार, 23 जून 2020

172 धावांचे विजयी लक्ष्य वाटते तितके सोपे नव्हते, पण कठीणही नव्हते. देशपांडे, पिंप्रीकर व चाटी हे आघाडीचे तीन फलंदाज 20 धावांमध्ये माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील बघे (57 धावा) व खोत (54 धावा) यांनी निर्णायक भागीदारी केली. शेवटच्या क्षणी सामना हातून निसटण्याची चिन्हे दिसत असतानाच, तळाचे फलंदाज पेंढारकर यांना नाबाद 18 धावांची बहुमूल्य खेळी करत मध्य प्रदेशच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फेरले.

नागपूर : क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी, विदर्भाने काही सामने एकट्याच्या बळावरदेखील जिंकले आहेत. यजमान विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात 57 वर्षांपूर्वी व्हीसीए मैदानावर झालेला तीनदिवसीय रणजी सामना त्यापैकीच एक. रोमहर्षक ठरलेल्या या अटीतटीच्या लढतीत विदर्भाचे दिग्गज फिरकीपटू एम. सिद्दीकी यांनी दोन्ही डावांमिळून तब्बल बारा गडी बाद करून आपल्या संघाला एका गड्याने थरारक विजय मिळवून दिला. 

नोव्हेंबर 1963 मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात विदर्भाचे नेतृत्व डी. डी. देशपांडे यांनी केले, तर मध्य प्रदेशचा संघ चंदू सरवटे यांच्या नेतृत्त्वात खेळला. देशपांडेंसह विजय पिंप्रीकर, एस. ए. रहिम, के. एस. चाटी, ए. एम. बघे, एस. आर. दाते, पी. एन. खोत, एस. पेंढारकर, एम. सिद्दीकी, पी. एस. साठे व एस. डी. ओकसारखे त्या काळातील दर्जेदार खेळाडू विदर्भ संघात होते. सरवटेंच्या संघातही अशोक जगदाळे, एस. सक्‍सेना, आर. भाटिया, एस. भगवानदास, एन. पेंढारकर, एस. गायकवाड, एन. दुआ, जे. खट्टरसारखे "मॅचविनर्स' होते. 

 गोलंदाजांनीच केली फलंदाजांची कत्तल! कशी हे वाचा 

सिद्दीकींच्या सात बळींच्या जोरावर विदर्भाने मध्य प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 201 धावांमध्ये रोखून धरत सुरुवात चांगली केली. सलामीवीर अशोक जगदाळे (67 धावा) यांचा अपवाद वगळता मध्य प्रदेशचा एकही फलंदाज सिद्दीकींची फिरकी खेळू शकला नव्हता. नवव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या गायकवाड यांच्या 42 धावांमुळे पाहुण्यांना दोनशेचा टप्पा गाठता आला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाचा डाव 173 धावांतच आटोपला. चाटी यांची 67 धावांची जिगरबाज खेळी विदर्भाच्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. 28 धावांच्या छोट्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात करणाऱ्या मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी पुन्हा सिद्दीकींच्या फिरकीपुढे सपशेल शरणागती पत्करली. सिद्दीकी यांनी पाच बळी टिपून मध्य प्रदेशला 143 धावांत गुंडाळण्यात निर्णायक योगदान दिले. रहिम यांनीही तीन बळी टिपून त्यांचा भार कमी केला. मध्य प्रदेशकडून दुसऱ्याही डावात जगदाळेंनी 64 धावा फटकावल्या. 

हेही वाचा  : केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय!

 
...अन्‌ व्हीसीएवर साकारला रोमांचक विजय 

172 धावांचे विजयी लक्ष्य वाटते तितके सोपे नव्हते, पण कठीणही नव्हते. देशपांडे, पिंप्रीकर व चाटी हे आघाडीचे तीन फलंदाज 20 धावांमध्ये माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील बघे (57 धावा) व खोत (54 धावा) यांनी निर्णायक भागीदारी केली. शेवटच्या क्षणी सामना हातून निसटण्याची चिन्हे दिसत असतानाच, तळाचे फलंदाज पेंढारकर यांना नाबाद 18 धावांची बहुमूल्य खेळी करत मध्य प्रदेशच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फेरले. विदर्भाच्या विजयात कमीअधिक प्रमाणात सर्वांचेच योगदान असले तरी, डझनभर बळी टिपणारे सिद्दीकी हेच "वन मॅन शो' ठरलेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "One Man Show" at VCA 57 years ago