देणाऱ्याचे हात हजारो...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

संजय गुप्ता यांनी आपला पन्नासावा वाढदिवस नुकताच साजरा केला. मात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीने. वाढदिवशी जंगी पार्टी देणे, मित्रांची मैफल जमविणे, नातेवाईकाच्या गराड्यात केक कापणे, या सगळ्याला फाटा देत त्यांनी गरीब-अनाथांना मदत करीत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. आणि सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांना थोडीथोडकी नव्हे तर 21 लाखांची देणगी दिली.

नागपूर : भारताचा इंडिया होताना एक वर्ग अती श्रीमंत होत चालला आहे तर दुसरीकडे हाता-तोंडाची गाठ पडणेही कठीण असलेला वर्गही आहे. अती श्रीमंत वर्गाची स्वत:ची जीवनशैली आहे. त्यांचे वेगळे कल्चर आहे, पार्टी, क्‍लब आणि असेच काही... फुटपाथवर जगणाऱ्यांच्या मात्र उशाला दगड आणि आकाशाचे छत. रोटी, कपडा मकान या जीवनावश्‍यक गोष्टीही त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. श्रीमंतांच्या बर्थडे पार्टीजला महागडा केक आणि गरीबांना वाढदिवशी भाकरीचा चंद्रही दुरापास्त.

अतीश्रीमंत वर्गातील काही माणसे मात्र वंचितांचे हे दु:ख जाणतात आणि अशा वंचित समाजासाठी काहीतरी करण्याचे निमित्त शोधत राहातात. वाढदिवसाला जंगी पार्टी करून लाखो रुपये उधळणारे काही आहेत मात्र सामाजिक भान ठेवणारे व समाजाचे आपण काही लागतो याची जाणीव ठेवणारेही काही आहेत. त्यांच्याच दानशूरपणामुळे सामाजिक संस्थांनाही सामाजिक कार्य करण्यासाठी पाठबळ मिळत आहे. दी नागपूर अशोक हॉटेलचे संचालक संजय गुप्ता हे देखील असेच एक नाव. पराईपीड जाणणारे वैष्णव.

सविस्तर वाचा - घरी सुरू होती लग्नाची तयारी अन् कोसळले दुःखाचे डोंगर

संजय गुप्ता यांनी आपला पन्नासावा वाढदिवस नुकताच साजरा केला. मात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीने. वाढदिवशी जंगी पार्टी देणे, मित्रांची मैफल जमविणे, नातेवाईकाच्या गराड्यात केक कापणे, या सगळ्याला फाटा देत त्यांनी गरीब-अनाथांना मदत करीत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. आणि सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांना थोडीथोडकी नव्हे तर 21 लाखांची देणगी दिली. अनेक समाजसेवी संस्था समाजातील गरीब-वंचितांसाठी कार्य करीत आहेत. त्यांना गरज आहे आर्थिक दान देणाऱ्या दानशुर कर्णांची. संजय गुप्तांसारख्या दानशुरांकडून प्रेरणा घेत मदतीचे अनेक हात पुढे आलेत तर वंचितांच्या जीवनाचेही ग्रहण सुटेल.

अधिक वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्...

देणगीमध्ये अनेक संस्थांचा समावेश

अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या श्री श्रद्धानंद अनाथालय, पाड्यांवर राहणाऱ्या व भटकंती करणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना साक्षर करणाऱ्या आदीवासी फासेपारधी समाज सुधार समितीच्या मतीन भोसले यांच्यातर्फे फासेपारधी मुलांसाठी चालविण्यात येणारी शाळा, वारंगणाच्या मुलांचे संगोपन करणारी राम इंगोले यांची संस्था आणि कुठलेही शुल्क न आकारता योग प्रशिक्षण केंद्र चालवत रुग्णांना मदत करणाऱ्या संस्था अशा विविध संस्थांना त्यांनी ही आर्थिक मदत दिली आणि आयुष्याचे अर्धशतक अनोख्या पद्धतीने साजरे केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one nagpurian gave donation on his birthday