ऐन दिवाळीत कांद्याचे वांदे, फराळातूनही कांदा होणार गायब

onion rates increases due to rain
onion rates increases due to rain

नागपूर : देशातील विविध भागामध्ये परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पीके वाया गेली असून कांदा आणि बटाट्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बटाटे आणि कांद्याच्या किंमतीत दिवसेंदिवस सतत वाढ होत आहे. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी इराणमधून २५ टन कांदा दाखल झाला आहे. मात्र, तो कांदा चवीला चांगला नाही. त्यामुळे स्वदेशी कांदा दिवाळीपर्यंत १२० रुपये प्रति किलोचा आकडा गाठण्याचे संकेत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या चिवड्यातील कांद्याला यंदा सुटी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच बटाट्याचे भावही प्रति किलो ६० रुपयावर जाण्याची शक्यता आहे. 

राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतातील कांदा खराब झाला आहे. त्याचा फटका कांद्याच्या दराला बसू लागला आहे. कर्नाटकमध्ये पावसामुळे कांद्यावर परिणाम झाला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे कांद्याची आवकही कमी झाल्याने किंमती वधारत आहे. 

उपहारगृहे सुरू झाल्याने वाढलेली मागणी आणि अतिवृष्टीने खरिपाच्या कांद्याचे झालेले नुकसानीमुळे सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणले. शहरात कांद्याच्या किरकोळ दराने ७०-८० रुपयांवर झेप घेतली. परतीच्या पावसाचा फटका हैदराबाद, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील  कांद्याला बसल्याने नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी, बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. डिसेंबपर्यंत कांद्याचे दर तेजीत राहतील, असे जाणकारांनी सांगितले.  

घाऊक बाजारात सध्या फक्त आठ ते दहा गाड्यांची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत ही आवक अतिशय अल्प आहे. सध्या जुन्या कांद्याच्या सहाय्याने बाजारात कांदा येत आहे. तसेच खराब कांदाही बाजारात येत  असून त्याचे भाव वाढलेले आहेत. त्यालाही घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये, असा दर मिळाला आहे. काद्यांची आवक सुरळीत होईपर्यंत पुढील दोन महिने कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. छिंदवाडा, इंदोर परिसरात झालेल्या पावसाने तेथील बटाट्याची नवीन पिके वाया गेली आहेत. त्यामुळे बटाट्याचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात सध्या ३० ते ३५ रुपये बटट्याचे दर आहेत. त्यातही अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.   
 

नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे दर चढेच -
पावसाने शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढलेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी नवीन कांद्याचा हंगाम सुरू होतो. यंदा नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. डिसेंबपर्यंत नवीन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जुन्या कांद्याचे दर चढेच राहणार आहे. 
- विश्वबंधू गुप्ता, संचालक, युपी आलू कांदा भंडार, कळमना

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com