esakal | शाळेची घंटा वाजली, पण विद्यार्थीच दिसेना; नवा विषाणू आढळल्याने पालक संभ्रमात
sakal

बोलून बातमी शोधा

only few student came in school on first day in nagpur

गेल्या काही दिवसांत इंग्लंडमधून आलेल्या कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेला रुग्ण सापडल्याने केवळ ३० टक्के पालकांनीच संमतिपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.

शाळेची घंटा वाजली, पण विद्यार्थीच दिसेना; नवा विषाणू आढळल्याने पालक संभ्रमात

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : महानगरपालिका हद्दीतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. त्यासाठी पालकांकडून शाळेत पाठविण्याचे संमतिपत्र गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत इंग्लंडमधून आलेल्या कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेला रुग्ण सापडल्याने केवळ ३० टक्के पालकांनीच संमतिपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाची भीती अद्यापही पालकांच्या मनात कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज शाळेत शुकशुकाटच पाहायला मिळाला.

हेही वाचा - नव्या काँग्रेस प्रदेशाध्यपदासाठी नावाची चर्चा रंगताच नाना पटोलेंनी दिले सूचक उत्तर

ग्रामीण भागातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी ३ जानेवारीपर्यंत शहरातील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. ही मुदत संपल्याने आता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. नागपूर शहरातील इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या ५९३ शाळा आहेत. यांपैकी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये २५८ शिक्षक, तर एकूण ६ हजार २५२ शिक्षकांना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय पालकांचे संमतीपत्रही घ्यायचे आहे. मात्र, पालकांकडून त्याबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. शहरात, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच बऱ्याच पालकांनी शाळांमध्ये संमतिपत्र देण्यास नकार दिल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - 'आता विदर्भातील जनतेला मिळणार थेट मदत, महाराष्ट्राचे संसदीय कामकाजात क्रांतिकारी पाऊल'

१९ शिक्षक पॉझिटिव्ह -
महानगरपालिका हद्दीत असलेल्या शाळांमध्ये ६ हजार २५२ शिक्षकांचा समावेश आहे. यापैकी ५ हजार ३५६ शिक्षकांचे कोरोना चाचणी अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाले. यामध्ये १९ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शिक्षकांना शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
 
खासगी शाळांना मिळावे साहित्य - 
शहर हद्दीत असलेल्या खासगी अनुदानित शाळांनी शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे शाळांना सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, हायपोक्लोराईड, ऑक्सीमिटर आदी साहित्य देण्याची मागणी नागपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कृती समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - रहीमभाई अन् कावळ्यांची अनोखी मैत्री; हॉर्न वाजताच जमतो थवा, अंगाखांद्यावर खेळल्यानंतर...

शिक्षक व कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग -
सर्व शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोज थर्मल स्क्रीनींग केली जाईल. तसेच शाळेच्या आवारात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. 

पालकांसाठी सूचना -
पालकांनी विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडण्याचे सांगितले आहे. स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही, तसेच रोज निर्जंतुक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घेण्याचे निर्देश दिले. सर्व शाळांना थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, साबण इत्यादींची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.