उपराजधानीत पुन्हा ऑपरेशन वॉशआऊट-क्रॅकडाऊन; गुन्हेगारमुक्त शहरासाठी ३१ मार्चचा अल्टीमेटम 

अनिल कांबळे 
Sunday, 21 February 2021

पोलिस आयुक्त म्हणाले की, बीट मार्शल आणि चार्लीचा वर्दीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. ४८० चार्लींना डांगरीसारखा दिसणारी वर्दी देण्यात येणार असून त्यांचा  वापर फक्त गस्तीसाठी करण्यात येणार आहे.

नागपूर ः शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कंबर कसली असून येत्या ३१ मार्चपर्यंत ‘गुन्हेगारमुक्त शहर’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी कामाला लागले असून प्रत्येक गुन्हेरावार ‘वॉच’ ठेवत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

पोलिस आयुक्त म्हणाले की, बीट मार्शल आणि चार्लीचा वर्दीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. ४८० चार्लींना डांगरीसारखा दिसणारी वर्दी देण्यात येणार असून त्यांचा  वापर फक्त गस्तीसाठी करण्यात येणार आहे. घटनास्थळावर पोहचण्याचा वेळ कमी ७ मिनिटांपेक्षा कमी करण्यासाठी चार्लींनी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. १२० नव्या बाईक्स त्यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे घटनास्थळावर ‘रिचींग टाईम’ केवळ ४ ते ५ मिनिटाचा करण्यावर भर आहे.

हेही वाचा - तेजबीरसिंग म्हणाले, आता कुठे महात्मा गांधी आणि भगतसिंग एकत्र आले

गेल्या २० वर्षांचा गुन्हेगारीचा आढावा घेण्यात आला. शहरातील सहा हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी १५०० जणांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली तर ८५० जणांनी चक्क शहर सोडले असल्याचे समोर आले आहे. रोज ४०० ते ५०० गुन्हेगारांचा आढावा घेण्यात येत आहे. गुन्हेगार दत्तक योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रत्येक गुन्हेगारांवर वैयक्तिक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

ऑपरेशन वॉश आऊट 

शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी ऑपरेशन वॉशआऊट, ऑपरेशन क्रॅकडाऊन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गुन्हेगारांमधील टोळीयुद्ध संपविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील अवैध धंदे, ड्रग्स तस्करी, जुगार आणि क्रिकेट बुकींचा विषय संपविण्यासाठी पोलिसांचे ‘पंटर’ कामाला लागले आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीची माहिती पोलिसांना मिळत असल्याचेही आयुक्त कुमार म्हणाले.

हेही वाचा - बाप्पा बाप्पा! कांदा प्रतिकिलो ५० रुपयांवर; लसणाची फोडणीही महागली

आरोपींबाबत नो रिस्क 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही आरोपीला ताब्यात किंवा अटक करण्यापूर्वीच त्याची आरटीपीसीआर टेस्क करण्यात येईल. वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आरोपीला अटक केल्या जाईल. पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी निर्णय घेण्यात आला असल्याचे अमितेश कुमार म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operation washout and crackdown in Nagpur till 31st march