#Success Story : विनोद रायसे यांनी पिकवले सेंद्रिय धान; पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी

Organic paddy grown by Vinod Raise
Organic paddy grown by Vinod Raise

कामठी (जि. नागपूर) : कामठी तालुक्यातील झरप गावचे शेतकरी विनोद रयसे हे त्यांच्या शेतीत आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे प्रयोग करीत असतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयोग त्यातीलच एक आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, अनेक शेतकरी त्यांचे अनुकरण करीत आहेत.

धानाच्या शेतीला रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागतो. त्यामुळे धानाचे पीक खर्चाचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. यावर उपाय शोधण्याच्या प्रयोगात विनोद रयसे यांनी धान पीक पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने घेण्याचे ठरवले. यासाठी कृषी सहायक नलिनी रामटेके, कृषी पर्यवेक्षक मनीष माळोदे, ऑरगॅनिक औषधांबाबत नेटसर्फचे दिवाकर डांगे, गुमथळा येथील प्रगतिशील शेतकरी नाना वाघ, व्यंकटेश्वरा पाॅवर प्रोजेक्ट बाबदेव साखर कारखान्याचे कृषी अधिकारी धनराज बोबडे यांचे मार्गदर्शन घेतले.

यासाठी सर्वप्रथम माती परीक्षण केले. आपल्या शेतात धान पिकांकरिता आवश्यक असलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांची कमतरता आहे, याची माहिती मिळाल्यावर रासायनिक घटक न देता सेंद्रीय खत, गांडूळ खत, शेणखत व ऑरगॅनिक घटकांचा वापर केला.

शंभर टक्के सेंद्रिय

पीक तयार झाल्यावर तांदळाची शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणी केली. यात शतप्रतिशत सेंद्रीय तांदूळ तयार झाल्याचे निष्पन्न झाले. अगदी कमी खर्चात सेंद्रिय तांदळाचे पीक मिळाल्यामुळे आता दरवर्षी याच प्रकाराने सेंद्रिय तांदूळ, चणा, गहू या पिकांसोबत उसाचे पीकही सेंद्रिय पद्धतीने घेणे सुरू आहे. इतरही शेतकरी बांधवांनी या प्रकाराची शेती करावी याकरिता त्यांच्या शेतात धानाचे बियाणे तसेच उसाची रोपेही पुरविण्याचा उपक्रम सुरू केला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नागपूर जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात विनोद रयसे यांना यश लाभले.

शेतीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
पीक लवकर येण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविण्याच्या नादात रासायनिक खतांचा भडिमार पिकांवर केला जातो. परंतु, हे धान्य विविध आजारांचे कारण ठरत आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय शेतीवर लक्ष केंद्रित करण्याची आज गरज आहे.
- विनोद रयसे,
प्रगतिशील शेतकरी

 संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com