‘ऑस्टिओपोरोसिस’ व्याधीमुक्तीचे मिशन

केवल जीवनतारे
Tuesday, 20 October 2020

हिटकोअंतर्गत संगणकावर कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातील महिलांना निःशुल्क प्रशिक्षण देऊन या आजाराशी लढा देण्याचा उपक्रम तायगांव खैरी या छोट्याशा खेड्यातून सुरू झाला. हा प्रकल्प ५१ गावांमध्ये यशस्वी झाला. राज्यासह देशातील गावात पोहचवण्याचा संकल्प डॉ. चौधरी यांचा आहे. 

डॉ. चौधरी यांच्या तायगाव खैरीतून सुरू झालेल्या हिटको प्रकल्पाची जागतिक भरारी 

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते, "खेड्यांकडे चला. परंतु डॉक्‍टर खेड्यात जाण्यास इच्छुक नाहीत. गावखेडे अनारोग्याचे माहेरघर बनत असून २०५० पर्यंत ३०० टक्क्यांनी हा आजार वाढणार आहे. मात्र, गावखेड्यातील महिलांची "हाडे ठिसूळ' होणाऱ्या (ऑस्टिओपोरेसिस) आजारातून मुक्ती देण्यासाठी नागपुरातील खासगी अस्थिरोग तज्ज्ञाने निःशुल्क माहिती देणारे शासकीय मदतीशिवाय ‘ग्रामीण आरोग्य शिक्षण अभियान'सुरू केले. त्यांच्या या ऑस्टिओपोरोसिस' व्याधी मुक्ती मिशनचे जगभरात कौतुक होत आहे. रशियन तंत्रज्ञानाच्या वापरातून "टेलिकन्सलटेशन'चा वापर केला होता. यात सुधारणा करीत आता गावखेड्यातील महिलांच्या व्याधीमुक्तीसाठी लाखो रुपये खर्चुन हिटको मोबाईल व्हॅन तयार केली आहे. त्या अस्थिरोग तज्ज्ञाचे नाव डॉ. संजीव चौधरी. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

पंचेचाळीशीतील महिलांच्या आरोग्याचा "गुप्त शत्रू' असलेला हाडे ठिसूळ होण्याचा आजार (ऑस्टिओपोरेसिस) वाढत आहे. दरवर्षाला १ कोटी रुग्णांची नोंद भारतात होते. या आजाराच्या विळख्यात गावखेड्यातील महिला अडकत आहेत. पाठीच्या कण्याचे हाड, जांगेचे हाड, हाताचे हाड तुटण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते. यावर मात करण्यासाठी जनजागृतीचा अभाव आहे. यामुळे हा आजार वाढत आहे. हिटकोअंतर्गत संगणकावर कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातील महिलांना निःशुल्क प्रशिक्षण देऊन या आजाराशी लढा देण्याचा उपक्रम तायगांव खैरी या छोट्याशा खेड्यातून सुरू झाला. हा प्रकल्प ५१ गावांमध्ये यशस्वी झाला. राज्यासह देशातील गावात पोहचवण्याचा संकल्प डॉ. चौधरी यांचा आहे. 

हिटको मोबाईल व्हॅनची जगाने घेतली दखल 
ऑस्टिओपोरोसिस मुक्तीसाठी डॉ. चौधरी यांनी अद्वितीय अशी हिटको मोबाईल व्हॅन तयार केली. व्हॅन गावात पोचताच गाडीमध्ये ऑस्टिओपोरोसिसवर रचलेले लोकगीत वाजेल. लोकं गोळा होतील. बाह्य भागात मोठा टीव्ही संच लावला आहे. डॉ. चौधरी नागपुरात बसून मार्गदर्शन करतील. गावखेड्यातील महिला हाडाच्या आजारावर उपचाराची माहिती जाणून घेत असल्याचा भास होईल. ऑस्टिओपोरोसिसबाबत गावखेड्यात जनजागारणासाठी पहिलाच उपक्रम असल्याचे जागतिक ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सायरस कूपर म्हणाले. या आजाराच्या जनजागृती हिटको व्हॅन मैलाचा दगड ठरेल असा विश्वास अमेरिकेतील सुप्रसिद्ध तंत्रज्ञान शास्त्रज्ञ व भारतातील संगणक क्रांतीचे जनक सॅम पित्रोंडा यांनी व्यक्त केला. दुबईचे ब्रिटिश विद्यापीठाचे कुलपती शेख महंमद बिन अल मगदूम यांनी प्रसिद्ध पत्रक काढून डॉ. संजीव चौधरी यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती व एनआरआय फेडरेशनचे अध्यक्ष दीपक कावडीया यांनी हिटको व्हॅनला जगातील आरोग्य जगतातील पथदर्शक प्रकल्प असल्याचे संबोधले. 

अशी आहे व्हॅन 
-वातानुकूलित प्रदर्शन दालन 
-ऑस्टिओपोरोसिसची माहिती देणारे फलक 
-मानवी हाडावरचे प्रात्यक्षिक दाखवणारी यंत्रणा 
-व्हॅनमध्ये हाडांची घनता मोजणारे बी एम डी यंत्र 
-कॅल्शियम विटामिन डी सेवनातून उपचार सांगणारी माहिती 
-व्ही.सॅट, मल्टी सिम राउटरनी जोडलेली कॉन्फरन्सिंग यंत्रणा 

ऑस्टिओपोरेसिसग्रस्त महिलांमधील 20 टक्के महिलांना जीव गमवावा लागतो. ७० टक्के महिलाना अपंगत्व येते. या व्याधीतून मुक्तीसाठी हाडाची घनता मोजण्याची "बीएमडी' तपासणी आहे. शहरी व ग्रामीण महिलांपर्यंत पोहचण्यासाठी सामाजिक दायित्व समजून "ऑस्टिओपोरेसिस' व्याधीची माहिती देण्यासाठी हिटको मोबाईल व्हॅन तयार केली. निःशुल्क उपचारापासून या आजाराची माहिती देणारी यंत्रणा गावखेड्यात पोहचणार आहे. 
-डॉ. संजीव चौधरी, प्रसिद्ध अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osteoporosis ’mission to cure the disease