आरोग्य यंत्रणा हादरली; कुष्ठरोगाच्या ३१ संशयितांमुळे खळबळ; शोध मोहिमेला सुरुवात

राजेश प्रायकर 
Tuesday, 1 December 2020

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत शहरात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम पंधरवड्याला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते सदर येथील रोग निदान व अनुसंधान केंद्रात सुरुवात करण्यात आली

नागपूर: सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम पंधरवड्याचे उद्‍घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कुष्ठरोगाचे ३१ संशयित आढळून आले. कोविडमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा हादरली असतानाच कुष्ठरोगाचे संशयित आढळल्याने खळबळ माजली आहे. संशयितांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय क्षयरोगाचे चार संशयित आढळले.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत शहरात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम पंधरवड्याला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते सदर येथील रोग निदान व अनुसंधान केंद्रात सुरुवात करण्यात आली. ही शोध मोहीम १ ते १६ डिसेंबरपर्यंत आहे. 

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

मंगळवारी क्षयरोग सोसायटीच्या ४३३ चमूंनी २१,८४१ लोक संख्येचा सर्वेक्षण केला. सर्वेक्षणामध्ये ४ संदिग्ध रुग्ण आढळले असून त्यांची तपासणी करून पुढील उपचार केले जाईल. याशिवाय कुष्ठरोगाचे ३१ संशयित आढळल्याने आरोग्य विभागात धडकी भरली. दरम्यान, शोध मोहिमेंतर्गत झोपडपट्टी, विटाभटटी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरित तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर तसेच तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह, मनोरुग्णालयातील नागरिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. 

मोहिमेला सुरुवात करतेवेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, नागपूर विभागाचे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार, डॉ. अनिरुध्द कडु, कुष्ठरोग विभागाचे डॉ. भोजराज मडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुल्लकवार तसेच मनपातील कुष्ठरोग विभाग नोडल अधिकारी डॉ. ख्वाजा, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, कुष्ठरोग पर्यवेक्षक फुले, उत्तम मधुमटके, रितेश दातीर, सरीता रामटेके, अविनाश थुल यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या. 

यावेळी आशा सेविकांना मोहिमेचे साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी राम जोशी यांनी क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार चालू करण्याचे आवाहन मनपाच्या शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या सदस्यांना केले. या मोहिमेसाठी जनतेनेसुध्दा सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव 

शोध मोहिमेतील आशा सेविकांना अंगावर चट्टे, त्वचेचे विकार असलेल्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी नोंदणी केली. ३१ जणांच्या अंगावर चट्टे, त्वचेचे विकार आढळून आले. हे कुष्ठरोगाचे संशयित आहेत. त्यांची योग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच कुष्ठरोग आहे की नाही, हे स्पष्ट होईल.
- डॉ. शिल्पा जिचकार, 
मनपा आरोग्य अधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: over 31 leprosy suspects search operation started