सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षा कमी भाव

कृष्णा लोखंडे
Tuesday, 1 December 2020

खरीप हंगामात यंदा अतिपाऊस व अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाची वाट लावल्यानंतर त्यावर विविध रोगांच्या आक्रमणाने पुरती वाताहत केली. उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतही घसरली. सुपर दर्जाच्या (यलो) सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आहे.

अमरावती : पावसाने वाताहत केल्यानंतर हाती लागलेल्या सोयाबीनला दिवाळीनंतर बाजारात मागणी वाढली आहे. कमी उत्पन्नामुळे मागणी वाढल्याने भावही थोडे वधारले आहेत. अल्प आवक असलेल्या उच्च दर्जाच्या सोयाबीनला अमरावतीच्या बाजार समितीत हमीदरापेक्षा अधिक भाव मिळू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी बाजारात 370 रुपये भाव हमीदरापेक्षा अधिक मिळाला. मात्र, भावाच्या तुलनेत आवक अल्प राहिली.

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, ३५ हजार मतदार...

खरीप हंगामात यंदा अतिपाऊस व अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाची वाट लावल्यानंतर त्यावर विविध रोगांच्या आक्रमणाने पुरती वाताहत केली. उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतही घसरली. सुपर दर्जाच्या (यलो) सोयाबीनची उत्पादकता कमी झाली आहे. मीडियम दर्जाचा सोयाबीन असला तरी त्याचीही उत्पादकता फार नाही. दिवाळीपूर्वी आवक कमी होती. ती दिवाळीनंतर वाढण्याची अपेक्षा वर्तविली जात असताना चित्र फारसे बदलले नाही. शनिवारी (ता.28) येथील बाजार समितीत केवळ 8 हजार 291 पोत्यांची आवक नोंदविली गेली. सुपर दर्जाच्या सोयाबीनला 4 हजार ते 4250 रुपये प्रतिक्विंटल तर मध्यम दर्जाच्या सोयाबीनला 3500 ते 3850 रुपये भाव मिळाला.

हेही वाचा - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात;...

वास्तविक या कालावधीत बाजार समितीत सोयाबीन घेऊन येणाऱ्या वाहनांची रांग असते व तीस हजार पोत्यांची आवक सरासरीने नोंदविली जाते. बाजारात चांगलीच वर्दळ राहते. यंदा मात्र ते चित्र अजूनही निर्माण झालेले नाही. दिवाळीपूर्वी बाजार समितीत सव्वा लाख पोत्यांच्या जवळपास आवक नोंदविल्या गेली आहे. तर दिवाळीनंतर आतापर्यंत पन्नास हजार पोत्यांचीही आवक होऊ शकलेली नाही. त्यातच माथाडींच्या वादामुळे तीन दिवस बाजार समितीमधील खरेदी विक्रीचे व्यवहार प्रभावित झाले होते. त्याचाही परिणाम आवकवर झाला आहे.

हेही वाचा - जागतिक एड्स दिवस : प्रथमच घटला एचआयव्हीग्रस्तांचा आकडा, यंदा ३९० पॉझिटिव्ह रुग्ण

यंदा आवक कमी राहण्याची शक्‍यता -
पाऊस व रोगांमुळे सोयाबीन पिकाचे खूप नुकसान झाले असून उत्पादनाची सरासरी घसरली आहे. त्यामुळे यंदा आवक कमी राहण्याची शक्‍यता आहे. कमी उत्पन्नामुळे शेतकरी खेडा खरेदीत विक्री करू लागले आहेत. त्याचाही परिणाम बाजार समितीमधील उलाढालीवर होऊ लागला आहे, असे अमरावती बाजार समितीमधील अडते राजेश पाटील यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soybean rate decreases in amravati