नियम धाब्यावर बसवून ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक

सतीश धारड
Monday, 9 November 2020

ट्रकमधील कोळशाला सुरक्षेकरिता ताडपत्री बांधणे बंधनकारक असतांनाही ताडपत्री बांधली जात नाही. अशात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तारसा रोडवरील दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी सदर वाहतुक थांबविण्याची मागणी केली आहे.

टेकाडी (नागपूर)  ः क्षेत्रातील वेकोलिच्या कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळशाची वाहतूक ट्रकच्या माध्यमातून केली जाते. महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी ट्रक चालक अनियमितरित्या शहरातील रहदारीच्या तारसा रोडवरून दिवसाढवळ्या नियमबाह्यरित्या वाहतूक करीत असतात.

ट्रकमधील कोळशाला सुरक्षेकरिता ताडपत्री बांधणे बंधनकारक असतांनाही ताडपत्री बांधली जात नाही. अशात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तारसा रोडवरील दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी सदर वाहतुक थांबविण्याची मागणी केली आहे.

वेकोलीमधून निघणारा कोळसा ट्रकमध्ये लोड करून मौदा एमटीपीसी किंवा भंडारा किंवा इतर ठिकाणी पाठविण्यात येतो. राष्ट्रीय महामार्गावर बोर्डा शिवारातील टोल नाका चुकविण्यासाठी ट्रक मालक आणि चालक हे टेकाडी-कांद्री-कन्हान मार्गे शहरातून जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या तारसा रोडवरून ओव्हरलोड ट्रक नेतात.

या कोळसा ट्रकमुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आहे. ओव्हरलोड कोळशाचा ट्रक ताडपत्रीने झाकला जात नाही. त्यामुळे ट्रकमधील कोळसा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडतो. परिणामी इतर वाहन चालकाच्या अंगावर हा कोळसा पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नियमाची पायमल्ली करणाऱ्या ट्रकमालक व चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिकांना दमा, आतड्याचे विकार, श्वसनाचे विकार अशा अनेक आजार जळत आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.यासोबतच कोळसा वाहतूक होत असलेल्या ट्रकच्या मागे असणार्या दुचाकीवाहनाच धुळीमुळे अपघातही विकार होण्याची शक्यता आहे. शहरातून कोळशाची जड वाहतूक थांबविण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस सोबतच सामाजिक कार्यकर्ते बरेचदा रस्त्यावर आलेले होते. मात्र तात्पुरत्या कारवाईनंतर जीवघेणी वाहतूक पुन्हा सुरू होत असल्याने कायमस्वरूपी कारवाई कधी हा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

आधी वेतनेत्तर अनुदान, मगच शाळांची सुरुवात

कोळसा ट्रकचे चालक रात्री ट्रक पार्क करण्यासाठी महामार्गाच्या सर्व्हिस रोडचा वापर पोलिसांच्या कारवाईला न जुमानता करतात. टेकाडी ते कांद्रीपर्यंत कोळसा भरलेल्या टिप्परने बरेच बळी घेतले आहेत. दुचाकी व पायी चालणाऱ्यांसाठी महामार्गावर सर्व्हिस रोड बनविण्यात आले आहे. मात्र जड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सर्व्हिस रोड अडकल्याने इतर वाहतुकदार असुरक्षित झाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overload coal truck on road