एका सत्पुरुषामुळे गावाला मिळाली ‘ईश्वरधाम’ अशी ओळख; हे गाव आहे तरी कोणते?

गुरुदेव वनदुधे
Wednesday, 11 November 2020

महाराज दररोज भक्तांना नवनवी शिकवण देत असतात. नुकत्याच संपलेल्या अधिकमासात (पुरुषोत्तम मास) दूरदूरून भक्तगण येथे आले. कारण, या गावाला लागूनच उत्तरवाहिनी बारमाही वाहणारी आमनदी आहे.

पचखेडी (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील पारडी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेले पचखेडी गाव अध्यात्मिकदृष्ट्या धार्मिक व भक्तिमय झाले आहे. गाव व्यसनमुक्त व तंटामुक्त झाले आहे. इथे सर्वच जाती धर्माचे लोक एकजुटीने व एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सुखात तर सहभागी होतातच पण दुःखातही सहभागी होतात. असे हे छोटेसे गाव आता ‘ईश्वरधाम’ म्हणून ओळखले जाते. याला निमिख ठरले हभप ईश्वर महाराज मंदिरकर...

हभप ईश्वर महाराज मंदिरकर यांनी ४२ वर्षांपासून भागवत सप्ताह करून नागरिकांना भक्तिमार्गात सामावून घेतले आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळेच गावातील लोकांनी तामसी वृत्ती सोडली. गाव व्यसनमुक्त झाले व तंटामुक्त झाले. इथे सर्वच जाती धर्माचे लोक एकजुटीने व एकोप्याने राहतात. ईश्वरधाममध्ये महादेवाचे मोठे मंदिर आहे. याच मंदिराच्या माध्यमातून महाराज दरवर्षी भागवत सप्ताह करतात.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

गावात अनेक सुधारणा झालेल्या आहेत. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी व गाव रोगराई मुक्त ठेवण्यासाठी भूमिगत नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. भूमिगत लाईटची सोय करण्यात आली आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रकोप सुरू असताना गावात एकही रुग्ण आजपर्यंत आढळून आलेला नाही. हभप ईश्वर महाराज यांनी गावाला लावलेली शिस्त व धार्मिक कार्याची ओढ यामुळे गाव सुजलाम-सुफलाम झाले आहे. यामुळेच की काय गावकऱ्यांनी गावांचे पचखेडी नाव बदलून ‘ईश्वरधाम’ केले आहे.

महाराज दररोज भक्तांना नवनवी शिकवण देत असतात. नुकत्याच संपलेल्या अधिकमासात (पुरुषोत्तम मास) दूरदूरून भक्तगण येथे आले. कारण, या गावाला लागूनच उत्तरवाहिनी बारमाही वाहणारी आमनदी आहे. या नदीत आंघोळ करून मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेणे व महारांजाचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी येत होती. एकंदरीत हभप ईश्वर महाराजाच्या सान्निध्याने गाव धार्मिक व भक्तिमय झाले आहे.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

संस्कार घडविण्याचे कार्य निरंतर

भागवत सप्ताहात महाराजांचे शिष्य आणि १० कि.मी. परिसरातील भाविक सहभागी होतात. येथे दररोज सायंकाळी सत्संग होतो. सत्संगात गावातील लोक एकत्र येऊन देवाचे नामस्मरण करतात. उन्हाळ्यात बाल संस्कार शिबिराचे आयोजन करून लहान बालकांच्या मनावर संस्कार घडविण्याचे कार्य निरंतर सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pachkhedi village got a new identity as Ishwardham