शेतकऱ्यांची वाट अद्यापही चिखलमयच, जलालखेड्यातील पाणंद रस्त्यांची दूरवस्था

panand roads are damaged in jalalkheda of nagpur
panand roads are damaged in jalalkheda of nagpur

जलालखेडा (जि. नागपूर): पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बारमाही चांगले पाणंद रस्ते निर्माण करण्याचा युती शासनाचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र काय झाले कुणास ठाऊक! या योजनेकडे कोणीही ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसारखी पाणंद रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. डबक्यासारखा पाणंद रस्त्यांचा बॅकलॉग निर्माण झाला आहे.

नरखेड तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पाणंद रस्ते आहेत. त्याची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र, देखभालीअभावी तालुक्यातील बऱ्याच पाणंद रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी चिखलमय पाणंद तुडवत शेतात जावे लागते. पावसाळा संपत आला. मात्र, अद्यापही शेतकऱ्याची वाट मात्र चिखलमयच आहे. तालुक्यातील अनेक पाणंद रस्ते हे बारमाही शेतात जाण्यायोग्य नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम त्याच्या पिकयोजनेवर पडत असल्यामुळे त्याला पावसाळ्यात येणारी पिके घेता येत नाही. त्याला पारंपारिक शेतीशिवाय पर्याय नाही. 

शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल, यासाठी पाणंद रस्त्याचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पाणंद रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत. शेतकऱ्यांना जोपर्यंत शेतात जाण्या-येण्यासाठी चांगले रस्ते मिळत नाही, तोपर्यंत त्याचे उत्पादन वाढणार नाही, अशी वल्गना प्रत्येक पक्ष करीत असतो. पण याकडे पाहिजे तसे लक्ष न गेल्यामुळे शेतकरी चिखलातूनच आपले मार्गक्रमण करून पिक काढत आहे.  

निधीच उपलब्ध झाला नाही - 
नरखेड तालुक्यातील शेत पाणंद रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी हे संत्रा व मोसंबी बागायतदार आहेत. रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने तेथून संत्रा व मोसंबी तसेच पावसाळी पिके व भाजीपाला या पिकांची वाहतूक करता येत नाही. म्हणून या भागातील शेतकरी त्रस्त आहेत. मागील युती शासनाच्या काळात पाणंद रस्त्याचा मोठा गाजावाजा करीत पालकमंत्री पाणंद रस्ता योजना सुरू करण्यात आली होती. तरी पण आजही पाणंद रस्त्याचे बॅकलॉग भरपूर आहे. त्यातच यावर्षी कोणतेही पाणंद रस्ता निधी उपलब्ध झाला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. तरी ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पाणंद रस्ता निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.  

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बारमाही चांगले पाणंद रस्ते निर्माण करण्याचा युती शासनाचा प्रयत्न होता. पण शासन गेले व नवीन शासनाने यावर निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे बळीराज्याच्या शेतात जाणारी वाट अवघड झाली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते शासनाने उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांच्या परिस्थिती मोठा बदल येऊ शकतो, असे जिल्हा परिषदेचे माजी सभापती उकेश चव्हाण म्हणाले. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com