शाळांच्या अवैध फीवाढीवर नागपूर येथील पालकांनी शोधला हा पर्याय, सुरू केले...

प्रमोद काळबांडे
सोमवार, 13 जुलै 2020

लॉकडाउन असले तरी खासगी शाळांनी ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. उद्देश हाच की आम्ही तुमच्या मुलांना ऑनलाइन शिकवतो आहे, त्या बदल्यात तुम्ही शाळीची फी भरा. एवढेच नव्हे तर कोरोनाचे महाभयंकर संकट कोसळल्यामुळे आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या असताना अनेक खासगी शाळांनी आपली फी कमी केली नाही. उलट शाळा सुरु नसतानाही फीचा आग्रह धरत आहेत. यावर त्रस्त झालेल्या पालकांनी एक आगळावेगळा मार्ग निवडण्याची तयारी चालविली आहे. यातून शिक्षणही उत्तम होणार आणि खर्च सुद्धा कमी होणार. काय आहे हा अनोखा मार्ग...

नागपूर : कोरोनाचे संकट ओढवले. देशातीलच नव्हे तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एवढेच नव्हे, तर मृत्यूसंख्याही वाढतेच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घाबरले आहेत. अनेकांचे रोजगारही गेले आहेत. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले आहेत. ज्यांच्या नोकऱ्या अजून शाबूत आहेत, त्यांच्या वेतनातही कपाती झाली आहे. कुठे पन्नास टक्के तर कुठे त्याहूनही जास्त. अशा वेळेस आपल्या मुलांच्या खासगी शाळांची फी कशी भरावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा तर अद्याप सुरु केलेल्या नाहीत. परंतु अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे ज्या पालकांकडे एकच स्मार्ट फोन होता, त्यांना आपल्या पाल्यासाठी दुसरा स्मार्ट फोन खरेदी करण्याची वेळ आलेली आहे. एवढेच नव्हे तर वारंवार रिचार्ज करणेही आवश्यक झाले आहे. प्रत्यक्ष क्लासरूममधले अध्यापन होत नसले तरी, ऑनलाईन शिकवणी सुरू केली आहे. तरीही फीमध्ये मात्र कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे पालक मात्र चिंताग्रस्त झाले. त्यावर काही सुजाण पालकांनी एक अनोखा मार्ग शोधायला सुरुवात केली आहे.

ठळक बातमी - आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...

पालकांचे नागपूर शहरात अनोखे आंदोलन

अमोल हाडके हे पालक गेल्या अनेक वर्षांपासून खासगी शाळेतील फीवाढीविरुद्ध आंदोलन करीत आहेत. यासंबंधाने त्यांनी संघटनाही स्थापन केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या यासंबंधाने अनेकदा खासगी शाळांच्या व्यवस्थापनासोबत बैठकाही झाल्या आहेत. शाळांच्या अमर्याद फीवाढीवर अंकुश ठेवण्याचे काम ते गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहरात करीत आहेत. त्यांच्या पुढाकारातून खासगी शाळांवर वचक ठेवणारी एक यंत्रणा नागपूर शहरात निर्माण झाली आहे. कोरोना काळात शाळा बंद झाल्या. परंतु फीची मागणी होतच आहे. अशात काय करावे, अशा काही तक्रारी त्यांच्याकडे गेल्या. त्यामुळे त्यांनी काही पालकांसोबत बोलून एक पर्याय शोधला आहे. त्याबाबत ते नागपूर शहरात आता मोठ्या प्रमाणात पालकांसोबत वेबिनार आयोजित करून तर कधी छोट्या कॉर्नर मिटिंग आयोजित करून चाचपणी करीत आहेत.

उघडून तर बघा - विश्‍वास बसेल का? मुख्यमंत्री उद्धवजी आमदार झाले मात्र निधी नाही, वाचा संपूर्ण प्रकार...

या पर्यायावर चर्चा

राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 नुसार भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे 1989 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुल नावाची एक संस्था सुरू करण्यात आली आहे. यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, सामान्य आणि शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच व्यावसायिक, जीवन समृद्धी आणि विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याच मुक्त विद्यापीठाअंतर्गत नागपूर शहरात काही शाखा उघडण्याची तयारी अमोल हाडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली आहे.

घराजवळच क्लासरूम

यासंबंधाने पालकांच्या काही बैठकाही त्यांनी आयोजित केल्या. नो डोनेशन, नो युनिफॉर्म, फ्रीडम ऑफ स्कुल फीज, शाळांच्या मनमानीपासून मुक्तता आदी विषयांवर पालकांसोबत वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आहे. मुक्त विद्यालयांचे क्लासेस होतील. परंतु. त्यात विद्यार्थ्यांची कमी संख्या असेल. एका क्लासमध्ये किमान पाच ते कमाल दहा विद्यार्थी असतील. किमान पाच विद्यार्थी ज्या  भागातील मिळतील, तिथे क्लासरुम सुरू करण्यात येईल. एवढेच नव्हे तर या क्लासरुममधून प्रत्येक विषय शिकविण्यासाठी त्या त्या विषयातील सर्वाधिक तज्ज्ञ शिक्षकांची सोयही उपलब्ध करुन देण्यात येईल. एवढेच नव्हे तर, मुलांच्या कलानुसार त्याला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रातील अभ्यासावर जास्त भर देण्यात येईल. क्रीडाचाही यात सहभाग असेल. अशी चर्चा पालकांच्या बैठकीत करण्यात आली.

हेही वाचा - या कॉंग्रेस नेत्यांची नवी पिढी राजकारणात सक्रिय

पालकांची एकजूट  

पालकांनी विशेषतः मुक्त विद्यालयातील फीबाबत जास्त प्रश्न केले. त्यावर खासगी संस्थांमधील फीपेक्षा येथील मुक्त विद्यालयातील फी किमान निम्म्याहून तर कमी असेलच असेल, अशी माहिती, या प्रकल्पाचे पालक-तज्ज्ञ विशाल डोईफोडे यांनी दिली. तुमचा मुलगा एखाद्या क्षेत्रातील मास्टर होण्यास मुक्त विद्यालय निश्चतच कामी येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अमोल हाडके आणि विशाल डोईफोडे हे स्वतः पालक आहेत. सर्वात आधी आमची मुले मुक्त विद्यालयात दाखल करू, असेही हाडके आणि डोईफोडे यांनी सांगितले. संदीप बेलेकर, अमित होशिंग आदी पालक आणि सकाळ प्रतिनिधी पालकांच्या बैठकांना उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

संपादन - प्रमोद काळबांडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents in Nagpur discovered new way on illegal school fees