
रामटेके कुटुंबीयांनी ही इमारत पाडण्यासाठी मनपाकडे अर्ज दिला होता. मात्र, ५० वर्षांपासून भाडेकरू असलेल्या चणे फुटाणे दुकानदाराच्या मुलाने दुकान रिकामे करण्यास नकार दिला. कपडे दुकानदारानेही नकार दिला. दोघांनीही न्यायालयातून स्थगिती मिळविली.
नागपूर : कमाल चौकातील एका जीर्ण इमारतीचा भाग शनिवारी दुपारी अचानक कोसळला. सुदैवाने यातून एक महिला बचावली. महापालिकेने तातडीने ही इमारत सोडण्याचे आदेश रहिवाशांना दिले. महापालिकेने शहरातील काही इमारती धोकादायक घोषित केल्या असून, त्या सोडून जाण्याचे आदेशही दिले. परंतु, नागरिक जीर्ण इमारतीतून बाहेर निघत नसल्याचे चित्र आहे.
कमाल चौकातील अत्यंत वर्दळीच्या भागात चंद्रकांता रामटेके यांच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम १९५६ मध्ये झाले होते. आता ही इमारत जीर्ण झाली असून महापालिकेने यापूर्वीच मालक तसेच येथील भाडेकरूंना सोडून जाण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. दरम्यान, आज दुपारी या इमारतीच्या वरच्या माळ्यावरील विटांची भिंत असलेला भाग अचानक कोसळला. त्यावेळी कपड्याच्या दुकानाखाली एक महिला बसली होती. ती यात सुदैवाने बचावली.
ही इमारत जीर्ण असून ती कधीही जमीनदोस्त होऊ शकते. त्यामुळे ती पाडण्यात यावी असे पत्र मनपाकडे आहे. परंतु, इमारतीतील भाडेकरूंनी या इमारती प्रकरणी न्यायालयातून स्थगनादेश मिळविल्याने यावर कारवाई होत नाही. इमारत मालक चंद्रकांता रामटेके यांच्या वडिलांनी या इमारतीत दोन भाडेकरू ठेवले होते. आता ते दोन्ही भाडेकरू हयात नाही. एक चणे फुटाणे व दुसरे एम्प्रेस मिलचे कपडे विक्री दुकान आहे. इमारतीचा वरचा माळा पूर्णतः कोसळण्याच्या अवस्थेत आहे.
रामटेके कुटुंबीयांनी ही इमारत पाडण्यासाठी मनपाकडे अर्ज दिला होता. मात्र, ५० वर्षांपासून भाडेकरू असलेल्या चणे फुटाणे दुकानदाराच्या मुलाने दुकान रिकामे करण्यास नकार दिला. कपडे दुकानदारानेही नकार दिला. दोघांनीही न्यायालयातून स्थगिती मिळविली. इमारत जीर्ण असतानाही मनपाचे वकील न्यायालयातून स्थगिती उठवू शकत नाही, असा आरोप आहे. त्यामुळे इमारत मालकाने आता या इमारतीची सर्वस्वी जबाबदारी मनपावर ढकलली आहे. यापूर्वीही दोनदा इमारतीचा काही भाग कोसळला होता.
जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामटेके कुटुंबीय इमारतीजवळ पोहोचले. त्यांनी या घटनेची माहिती पाचपावली पोलिसांना दिली. काही वेळानंतर मनपाचे अग्निशमन पथक, स्थापत्य अभियंता व अतिक्रमण पथकाचे प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळेही दाखल झाले. या इमारतीतील दोन्ही भाडेकरूंसह इमारत मालकासही मनपाने नोटीस दिली. यात इमारत धोकादायक अवस्थेत असून, तातडीने मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे