नातेवाईकांनी हात जोडून केली विनवणी; तरी डॉक्टरांनी रुग्णाला पाठवले घरी; मग झाला मृत्यू

केवल जीवनतारे
Sunday, 20 September 2020

कही डॉक्टर ऐकत नसल्याने अखेर रुग्णाला घरी नेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने या रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणात दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाइकांकडून करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

नागपूर : शुक्रवारी अपघातग्रस्त रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी आला; परंतु, त्याला घरचा रस्ता दाखविण्यात आला. अखेर या रुग्णाचा घरी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. मेडिकलमधील डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून न घेतल्यानेच मृत्यू झाला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.

मेडिकल आणि मेयोत कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कोविड रुग्णालय उभारले आहे. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांसाठी कमी खाटा शिल्लक आहेत. त्यातच डॉक्टरांसह इतरांवर कामाचा ताण वाढल्याने अन्य रुग्णांकडे मेडिकलमध्ये कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

सविस्तर वाचा - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी डॉ. बंग यांनी दिला सल्ला!

शुक्रवारी येथे अपघाताचा रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आला. थातूरमातूर उपचार करून त्याला परत पाठविले गेले. शनिवारी या रुग्णाचा घरी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. विठ्ठल पायगन (७०) असे मृताचे नाव आहे. बाबापूर, वर्णी, यवतमाळ येथील रहिवासी आहेत.

विठ्ठल यांचा पंधरा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांना नातेवाइकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पायाचे हाड मोडण्यासह त्यांना इतरही त्रास सुरू झाला. रुग्णाला नागपूरच्या मेडिकलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

शुक्रवारी दुपारनंतर नातेवाईक रुग्णाला घेऊन मेडिकलच्या आकस्मिक विभागात आले. डॉक्टरांची विनवणी केली; परंतु रुग्णाला दाखल केले नाही. अखेर रुग्णाला तात्पुरती मलमपट्टीची गरज असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्णाला घरचा रस्ता दाखविला.

वैद्यकीय मंत्र्यांकडे तक्रार करणार

रुग्णाला दाखल करायला कुणीच तयार नव्हते. एका अधिकाऱ्याने यासंदर्भात विचारणा केली. त्यांनाही रुग्णाला दाखल करण्याची गरज नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाचा फटका इतर आजाराच्या रुग्णांना बसत आहे. औषधोपचारही दिला गेला नाही. जखमेची मलमपट्टी केली गेली.

क्लिक करा - सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या

येथील एकही डॉक्टर ऐकत नसल्याने अखेर रुग्णाला घरी नेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने या रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणात दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाइकांकडून करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient dies as doctor avoids treatment