गडचिरोलीत तलावांच्या बाजूला मटण मार्केट; अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण  

मिलिंद उमरे 
Wednesday, 25 November 2020

गडचिरोली शहरात गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर अतिशय भव्य तलाव आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या तलावाच्या दुसऱ्या काठावर गोकुलनगर, चनकाईनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले.

गडचिरोली : निदान महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला मिळाला नसेल, असा निसर्ग सौंदर्याचा वारसा गडचिरोली जिल्ह्याला मिळाला आहे. शिवाय गडचिरोली शहरात अतिशय भव्य तलाव आहे. मात्र, एकीकडे इतर शहरांमध्ये अशा तलावांचे सौंदर्यीकरण होत असताना गडचिरोली शहरात मात्र, या सुंदर तलावाच्या परिसरात मटन मार्केट वसविण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून या तलाव परिसराच्या विकासाचे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

गडचिरोली शहरात गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर अतिशय भव्य तलाव आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या तलावाच्या दुसऱ्या काठावर गोकुलनगर, चनकाईनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. त्यामुळे या तलावाचा काही भाग अतिक्रमणधारकांनी आधीच गिळंकृत केला आहे. शिवाय शहरातील अनेक नाल्यांतून वाहणारे सांडपाणी याच तलावात सोडण्यात येत असल्याने तलावात घाण वाढत आहे. 

जाणून घ्या - युवकाला पडले रातोरात श्रीमंत झाल्याचे स्वप्न; सकाळी कोंबडा आरवताच केला आत्महत्येचा प्रयत्न 

या तलावाची कोणत्याही प्रकारची स्वच्छता होत नाही. आता कारगिल चौक परिसरात असणारा मटन मार्केट या तलावाच्या परिसरात सुरू करण्यात आला आहे. खरेतर ही जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. कारगिल चौक परिसरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरू असल्याने हा मटन मार्केट येथे हलविण्यात आल्याची चर्चा आहे. पण, या मांस विक्रीच्या दुकानांमुळे आधीच दुर्लक्षित असलेला हा तलाव आता अधिकच अस्वच्छ दिसत आहे. 

शिवाय या मांस विक्रीच्या दुकानातील मांसाचे अवशेष, प्लास्टिक व इतर कचरा तलावाच्या परिसरातच टाकला जातो. या तलावाची पाळ मोठी असून त्यावर मजबूत रस्ता तयार करून या तलावाला सौंदर्य प्रदान करता येऊ शकते. पण, या तलावाला सुंदर करणे दूरच त्याला अधिक विद्रूप करण्याचेच प्रकार दिसून येत आहेत. शहरातील नागरिकांना एकही चांगले विरंगुळ्याचे, मनोरंजनाचे किंवा फिरण्यासाठी स्थळ नाही. सेमाना वनउद्यान असले, तरी ते दूर आहे. स्मृती उद्यान अगदीच लहान असून तेसुद्धा कॉम्प्लेक्‍स परिसरात आहे. या तलावाच्या परिसराचे सौंदर्यीकरण झाल्यास हे उत्तम पर्यटन स्थळ ठरू शकते. पण, त्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

सविस्तर वाचा - शेतमजूर असलेल्या दिलीपची ही संपत्ती पाहून व्हाल थक्क; संग्रहात आहेत तब्बल ५० हजार अमूल्य वस्तू 

त्या प्रयत्नाचे काय झाले ?

काही वर्षांपूर्वी चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या धर्तीवर गडचिरोली शहरातील या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. राज्याचे आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनीच या कार्यात पुढाकार घेतला होता. या परिसरात थोडे बांधकामही सुरू झाले होते. पण, कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक. पुढे हे काम बंद झाले. त्या सौंदर्यीकरणाचे विद्रूप अवशेष येथे अद्याप बघायला मिळतात.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people are angry about the Mutton market near Lakes