Exclusive : अंथरुणाला खिळलेल्या 'सुनील'च्या मदतीसाठी सरसावले हात; कुणी रोख, तर कुणी दिले धान्य

नरेंद्र चोरे
Monday, 21 December 2020

कमाई बंद झाल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. सुनील यांना मूलबाळ नाही. पत्नी दुसऱ्याकडे धुणीभांडी करून थोडेफार पैसे कमावते.

नागपूर : दोन्ही पाय निकामी झाल्याने सहा महिन्यांपासून अंथरुणावर असलेले राऊतनगर (खरबी) येथील ६८ वर्षीय सुनील देऊळवाडकर यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कुणी रोख रक्कम, तर कुणी अन्नधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा - Success Story : लागवड एकदाच अन् उत्पादन ३५ वर्ष, दरवर्षी कमावतोय लाखोंचा नफा

'सकाळ'ने शनिवारी देऊळवाडकर यांची व्यथा मांडून मदतीचे आवाहन केले होते. बातमी प्रकाशित झाल्यानंतर अनेक हात त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घोडाम, बजाजनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे यांनी रोख रक्कम व अन्नधान्याच्या स्वरूपात भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय नागपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर, कार्याध्यक्ष मनीष वासनिक, राकेश आकरे, कोषाध्यक्ष अमोल तितरमारे, अजित थूल, उपाध्यक्ष रवींद्र घंगारे, माणिक चहांदे, अनिल शाहू, शैलेश डाहाड, नीलेश नेनारे, रितेश ठाकरे या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना आर्थिक मदत केली आहे. शहरातील इतरही दानशूर व्यक्तींनी फोन करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. 

हेही वाचा - गुलाबी थंडीत पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर; सूर्यही उगवतोय विलंबानेच

सुनील देऊळवाडकर गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून सायकलने घरोघरी वर्तमानपत्र वाटून मिळणाऱ्या कमिशनद्वारे आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र, दोन्ही पाय लुळे पडल्याने ते पाच-सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळून बसले आहेत. कमाई बंद झाल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. सुनील यांना मूलबाळ नाही. पत्नी दुसऱ्याकडे धुणीभांडी करून थोडेफार पैसे कमावते. छोट्याशा झोपडीत राहणारे सुनील यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे योग्य उपचारदेखील करू शकले नाहीत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people helps to poor sunil deulwadkar in nagpur