
रविवारी पहाटे कोरची शहर आणि बेडगाव परिसरात दाट धुक्याची चादर पसरली होती. तहसील कार्यालय परिसरातील खुल्या मैदानात, कोचीनारा हनुमान मंदिर परिसरात, मसेली, बेतकाठी व बेळगाव मार्गावर पहाटे फिरायला येणाऱ्यांची गर्दी मोठी असते.
कोरची (जि. गडचिरोली) : मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर पसलेली दिसते. या दाट धुक्यामुळे सूर्यकिरणेही पृथ्वीवर उशिरानेच पोहोचतात. त्यामुळे नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
रविवारी पहाटे कोरची शहर आणि बेडगाव परिसरात दाट धुक्याची चादर पसरली होती. तहसील कार्यालय परिसरातील खुल्या मैदानात, कोचीनारा हनुमान मंदिर परिसरात, मसेली, बेतकाठी व बेळगाव मार्गावर पहाटे फिरायला येणाऱ्यांची गर्दी मोठी असते. त्यामुळे आज पहाटे पडलेल्या धुक्याचा सुखद अनुभव तसेच गारव्याचा आनंद लोकांनी घेतला. गेले दोन दिवस पहाटे साडेपाच ते सकाळी सात वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली असते. परंतु रविवारी त्यापेक्षाही दाट धुके सर्वत्र पसरले होते.
निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. कोरची शहरात रविवारी पहाटेपासून ८ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक तसेच मॉर्निंग वाकला जाणाऱ्या लोकांना धुक्यामधून वाट शोधत जावे लागले. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तापमानात चढ-उतार अनुभवास येईल.
हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे. या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असले तरी, अनेक महिन्यांनी अनुभवायला मिळालेल्या धुक्याचा आनंद नागरिकांना आल्हाददायकच वाटत आहे. यंदा पावसाळ्यातही नागरिकांना उन्हाचा तडाखा सोसावा लागला होता.
हिवाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा वातावरण गरम होऊ लागले होते. तशी यंदा थंडीची सुरुवातही उशिराच झाली. पण, आता दाट धुक्याची सकाळ उजाडू लागल्याने वेगळाच आनंद अनुभवता येत आहे. धुक्यात हरवलेले रस्ते, वृक्ष, डोंगर बघताना मनाला सुखद अनुभूती मिळत असून कोरोनाच्या भयाचे ढग काही प्रमाणात का होईना दूर होत आहेत.
अधिक वाचा - काम करताना लघुशंकेसाठी गेलेली महिला परतलीच नाही; आरडाओरड होताच बसला धक्का
एरवी धुके कविमनाला आणि रसिकांना आनंद देणारे असले, तरी कल्पनेतही वास्तवतेचे भान सोडता येत नाही. भल्या पहाटे धुक्यामुळे सगळेच अंधारून येते. पुढची वाट दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका असतो. म्हणून पहाटे वाहन चालविताना वाहनचालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
संपादन ः राजेंद्र मारोटकर