जनता कर्फ्यू की जत्रा? रस्त्यांवर नागरिकांचा मुक्तसंचार; बाजारात गर्दी, दुकानेही सुरू 

people in nagpur did not follow Janata curfew
people in nagpur did not follow Janata curfew

नागपूर : नागरिकांच्या आरोग्यासाठी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकरांनी रविवारची सुटी दणक्यात साजरी केली. शनिवारच्या अल्प प्रतिसादानंतर रविवारी जनता कर्फ्यू उधळून लावत नागरिकांनी दिवसभर रस्त्यांवर गर्दी केली. सायंकाळी अनेक जण कुटुंबाला घेऊन चटपटीत खाण्यासाठी बाहेर पडल्याने पाणीपुरी स्टॉल, चायनीज स्टॉलला जत्रेचे स्वरूप आले होते. सुटी असल्याने दुकानांमध्येही आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. 

शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तासाला दोघांचा मृत्यू होत असून दररोज दीड ते दोन हजार बाधित आढळून येत आहेत. अजूनही अकरा हजारांवर बाधित उपचार घेत आहेत. प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही कोरोनावर अद्याप नियंत्रण आले नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

 या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी सप्टेंबरमधील शनिवार, रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली. काल, शनिवारी काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मात्र मुक्त संचार सुरूच ठेवला. ज्यांनी काल मुक्त संचार केला, ते आजही बाहेर पडले. तर काल घरात बसून जनता कर्फ्यूला प्रतिसाद देणारे आज बाहेर पडले. त्यामुळे रस्त्यांवर वाहने, नागरिकांची गर्दी दिसून आली. अनेक जण सुटीचा दिवस असल्याने घरात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले. 

शहरातील प्रमुख बाजारपेठा आज बंदच असल्याने त्या भागात नागरिक फिरकले नाही. मात्र, किरकोळ कपड्यांची दुकाने, भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू असल्याने नागरिकांनी तेथे गर्दी केली. सायंकाळीही चटपटीत खाण्यासाठी नागरिकांनी स्टॉलवर गर्दी केली. महापौर संदीप जोशी यांनी काल, नागरिकांचे आभार मानले होते. परंतु, आज जनतेनेच कर्फ्यू उधळून लावला. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याबाबतही नागपूरकर गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोनामुळे दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीतही नागपूरकर ऐकत नसेल तर त्यांची कुठल्या भाषेत समजूत काढावी, असा प्रश्न महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, आमदारांपुढे निर्माण झाला आहे.

२६, २७ ला पुन्हा जनता कर्फ्यू 

पुढील २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे.  येत्या शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० पासून ते सोमवारी २८ सप्टेंबरला  सकाळी ७.३० पर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे.

जनता कर्फ्यू अपयशी करण्याचा प्रयत्न : आमदार खोपडे 

शहराच्या जनतेने दोन दिवस जनता कर्फ्यूचे स्वागत केले. परंतु, शासनाने प्रशासनाचा वापर करून जनता कर्फ्यू अपयशी करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावून कूटनीती व दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. पोलिस आयुक्तांनी संकटाच्या वेळी पत्रक काढून जनता कर्फ्यूला मदत नाकारली तर मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत निर्णय झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्यांचाही सूर बदलला, असा आरोपही आमदार खोपडे यांनी केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com