सावधान ! पावसाळ्यात होऊ शकतो पिपरी गावाला धोका, कारण...

सुनिल सरोदे
मंगळवार, 16 जून 2020

कन्हान नगर परिषदेच्या पिपरी, धरमनगर, अशोकनगर, सुरेशनगर, रायनगरच्या लोकवस्तीमध्ये पावसाचे व कन्हान नदीच्या पुराचे पाणी शिरून नागरिकांना धोका होऊ शकतो. नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

कन्हान(जि.नागपूर):  वेकोलि कामठी खुल्या कोळसा खाणची माती पिपरी जुनीकामठी रोडच्या बाजूला नाल्यालगत खोलगट भागात डम्पिंग करण्यात येत आहे. कन्हान नदीत मिळणाऱ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह मातीने बंद होऊन पावसाळ्यात कन्हान नदीचे व नाल्याचे पाणी लगतच्या लोकवस्तीमध्ये शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास घरे, नागरिक व शेतीचे नुकसान होते. यात जीवितहानीचासुद्धा धोका नाकारता येत नसल्याने नाल्यातील व लगतची माती दूर करून नाला पूर्ववत करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

अधिक वाचा : सुशांत, तू एवढया लवकर जायला नको होतं

पर्यावरण विभागाची कुठलेही परवानगी नाही
वेकोलि कामठी खुली कोळसा खाणीची माती डम्पिंग ही प्रभाग क्र.6 पिपरी गावाच्या उत्तरेला व धरमनगरच्या पश्‍चिमेला असलेल्या महसूल नाल्यालगत खोलगट भागात मोठ्या प्रमाणात होते. मोठमोठ्या कृत्रिम टेकड्या तेथे निर्माण होत आहेत. वेकोलिने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कुठलेही परवानगी न घेता नाल्यांलगत माती टाकत असल्याने नाल्यात मोठे मोठे दगड, माती जमा होत आहे. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद होऊन पावसाळ्यात पावसाचे पाणी जमा होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : "ते' दृष्य पाहून मजुराची गेली तळपायाची आग मस्तकात, शेतमालकाची हत्या, काय होते कारण..

पूरस्थितीने होऊ शकते मोठ्या प्रमाणात नुकसान
कन्हान नगर परिषदेच्या पिपरी, धरमनगर, अशोकनगर, सुरेशनगर, रायनगरच्या लोकवस्तीमध्ये पावसाचे व कन्हान नदीच्या पुराचे पाणी शिरून नागरिकांना धोका होऊ शकतो. नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तसेच वेकोलिच्या कांद्री येथील खोलगट भागात पाणी जमा होऊन जवाहर नेहरू दवाखाना व वसाहतीत पूरस्थितीने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे कन्हान क्षेत्रातील वस्तीला पाणीपुरवठा करण्याकरिता अडचण होत आहे.

हेही वाचा : सॅनिटायझरमुळे तुम्हालाही होतोय त्रास? करा हे उपाय

वेकोलि प्रशासन व नगर परिषदेचे दुर्लक्ष
वास्तविक पाहता नदी किंवा नाल्याच्या वाहत्या प्रवाहात माती टाकणे व प्रवाह बंद करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक
वेकोलि महाप्रबंधक, वेकोलि प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून यामुळे पावसाळ्यात मोठी नैसर्गिकहानी व जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी जबाबदार वेकोलि अधिकारी, प्रशासन यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व नाल्यालगत टाकलेली माती दूर करून नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी वेकोलि कामठीचे उपक्षेत्र व्यवस्थापकांना निवेदन देऊन भाजपच्या संगीता खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष शंकर चंहादे, विरोधी पक्ष गटनेते राजेंद्र शेंदरे, माजी पाणीपुरवठा सभापती मनोज कुरडकर, नगरसेविका वंदना कुरडकरसह कार्यकर्त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pipri village may be in danger due to rains