घरातील खड्ड्यात लपवले मुलानं चोरून आणलेले दागिने; पोलिसांनी आईला केली अटक

अनिल कांबळे 
Saturday, 19 December 2020

८ डिसेंबरला रेड्डी यांच्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी हिरेजडित दागिन्यांसह ३० लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. ही घरफोडी ५१ गुन्हे दाखल असलेला रामा याने केल्याचे निष्पन्न झाले. 

नागपूर ः इंद्रप्रस्थनगर येथील व्यापारी तीमापुरम रेड्डी यांच्याकडे घरफोडी करून मुलाने चोरलेले दागिने घरात खड्डा खोदून लपवून ठेवणाऱ्या चोरट्याच्या आईला सोनेगाव पोलिसांनी अटक केली. चोरटा रामा मडावी हा फरार आहे. त्याच्या आईकडून पाच लाखांचे हिरेजडित दागिने व ५३ हजारांची रोख जप्त करण्यात आली. लताबाई दिनेश मडावी (वय ४४, रा. सालई खुर्द, कोंढाळी) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

८ डिसेंबरला रेड्डी यांच्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी हिरेजडित दागिन्यांसह ३० लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. ही घरफोडी ५१ गुन्हे दाखल असलेला रामा याने केल्याचे निष्पन्न झाले. 

जाणून घ्या - कल्पना सुचली अन् छतावर फुलविली पालेभाज्यांची बाग; घरीच मिळतो रसायनमुक्त भाजीपाला

पोलिसांनी रामाचे साथीदार मयूर बाभडे व विनोद कुमरे याला अटक केली. तपासादरम्यान रामा याने घरफोडीतील दागिने आई लता यांच्याकडे दिल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सालई खुर्द येथे छापा टाकला. जमिनीत गाडलेले हिरेजडित दागिने व रोख जप्त केली. पोलिस रामा याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांनी दिली.

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

कुख्यात मायकल कारागृहात स्थानबद्ध

नागपूर ः विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला सुदेश ऊर्फ मायकल दिनेश राऊत याला पोलिस आयुक्तांच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई वाठोडा पोलिसांनी केली. त्याच्यावर वाठोडासह नंदनवन पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात दंगा करून खून करण्याचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणे, दुखापत करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest mother who hide ornaments theft by her son