सकाळ इम्पॅक्ट: अखेर बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या खेळाडूस अटक; मानकापूर पोलिसांची कारवाई

नरेंद्र चोरे 
Friday, 25 September 2020

राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून खेळाडूंनी शासकीय नोकरी लाटल्याचे वृत्त 'सकाळ'ने नऊ तारखेच्या अंकात प्रकाशित केले होते. या बोगस खेळाडूंमध्ये नागपूरच्याही अनेक खेळाडूंचा समावेश असल्याचे उघडकीस आणले होते.

नागपूर : खेळाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका बोगस खेळाडूला मानकापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. संजय सावंत (रा. कामेरी, जि. सांगली) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संजयला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दैनिक 'सकाळ'ने या प्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, हे विशेष.

राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून खेळाडूंनी शासकीय नोकरी लाटल्याचे वृत्त 'सकाळ'ने नऊ तारखेच्या अंकात प्रकाशित केले होते. या बोगस खेळाडूंमध्ये नागपूरच्याही अनेक खेळाडूंचा समावेश असल्याचे उघडकीस आणले होते.

या बोगस खेळाडूंविरुद्ध प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड यांनी मानकापूर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी तपास करीत असलेले पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वात पाच सदसीय पथकाने आरोपी संजयला २० सप्टेंबरला सांगली येथून अटक केली. 

क्लिक करा - या देशांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत आहेत विचित्र कायदे; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

संजयला त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बीएस्सी झालेल्या संजयने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे २०१६ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षा पास केली होती. त्याची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवडही झाली होती. मात्र त्याने सादर केलेल्या प्रमाणपत्रातील तारखेत खाडाखोड आढळून आल्याने त्याच्यावर शंका आली. त्याचे प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, ते बनावट असल्याचे आढळून आले. शासनाची फसवणूक करणाऱ्या संजयने गुन्हा कबूल केला असून, त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे तपास अधिकारी शिंदे यांनी 'सकाळ' ला सांगितले. यामागे रॅकेट असल्याची चर्चा असून, त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहे.

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनी संजयशिवाय पवन पाटील (रा. नागपूर) आणि निखिल माळी (रा. गोडुली, जि. सातारा) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवर नोव्हेंबर २०११ मध्ये मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅंपोलिन (जिम्नॅस्टिक्स) स्पर्धेचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचा आरोप आहे. वास्तविक त्यावेळी अशी कोणतीच स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यात आली नव्हती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आरोपींविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न होता भरमसाठ पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी लाटण्याचे अनेक प्रकार राज्यातील विविध विभागांमध्ये उघडकीस आले आहेत. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर जवळपास ४० बोगस खेळाडूंनी पोलिस विभागासह विविध शासकीय सेवेत नोकरी लाटल्याची माहिती असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचे व कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - त्यांना कळतो केवळ माणुसकीचा धर्म; ज्याच्या त्याच्या धर्मानुसार देतात अंतिम निरोप

केवळ ट्रॅंपोलिन खेळात २५८ बनावट प्रमाणपत्रधारक आढळून आले आहेत. इतरही खेळांमध्ये अशी फसवणूक करणारे बोगस खेळाडू असू शकतात, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested player who is making fake documents