ते दरोडेखोर बसले होते अंधारात दबा धरून आणि...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

तिघांना अंधार फायद्याचा ठरला आणि तिघांचा मात्र अंधाराने घात केली. पोलिसांनी सहा पैकी 3 आरोपींना अटक केली, तर त्यांचे 3 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले.
 

नागपूर : अंधार आणि दरोडे यांचे खास नाते आहे. मात्र या दरोडेखोरांना कधीकधी अंधारही दगा देतो. अशीच घटना नुकतीच घडली आणि अंधारात दबा धरून दरोड्याच्या तयारीत लपून बसलेल्या टोळीवर पोलिसांनी छापा घातला. मात्र यातील तिघांना अंधार फायद्याचा ठरला आणि तिघांचा मात्र अंधाराने घात केली. पोलिसांनी सहा पैकी 3 आरोपींना अटक केली, तर त्यांचे 3 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले.

अटकेतील आरोपींमध्ये ठाकूर प्लॉट निवासी मोनू उर्फ शेख शाकीर शेख अमिर (24), आझाद कॉलनी निवासी चाजेब उर्फ समीर उर्फ धवन खान परवेज (22) आणि यासीन प्लॉट निवासी आसीफ घोडा शेख युसूफ (29) यांचा समावेश आहे.
फरार आरोपी सिंधीबन मोठा ताजबाग निवासी शेख मुबारक (35), हरपूरनगर मोठा ताजबाग निवासी राकेश उर्फ वामन रोकडे (23) व मोठा ताजबाग निवासी विकी सिद्धिकी (27) यांचा शोध पोलिस घेत आहेत.

सक्करदरा ठाण्याचे पीआय सत्यवान माने यांचे पथक सहकाऱ्यांसह रविवारी रात्री ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गस्तीवर होते. दरम्यान त्यांना गुप्त माहिती मिळाली की, शामबाग क्रीडा संकुलाजवळ काही युवक शस्त्रांसह गोळा झाले आहेत. त्यांची काही तरी मोठा गुन्हा करण्याची योजना आहे. या महितीवरून पोलिसांनी परिसरात सापळा रचून धाड टाकली असता मोनू, चाजेब आणि आसीफ घोडा हाती लागले, तर इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

सविस्तर वाचा - ठकबाज प्रीती दास जेलमध्ये क्‍वारंटाईन

अटकेतील आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तलवार, चाकू, कोयता, मिर्ची पावडर, दोरी, 2 दुचाकी व 3 मोबाईल असा एकूण 1 लाख 60,577 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींवर सक्करदरा ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested the robbers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: