पादचाऱ्यांचे मोबाईल लुटण्यात चक्क पोलिसाच्या मुलाचा सहभाग; आणखी दोघे अटकेत

संतोष ताकपिरे 
Saturday, 10 October 2020

ही टोळी राजापेठ पोलिसांच्या हाती लागली. शुभम आणि राजिक हे दोघे गुन्हा करताना स्पोर्ट बाईकचा वापर करीत होते. मोबाईल हिसकावल्यानंतर ते कुणालाही बेभाव विकून आलेल्या पैशात मौज करीत होते.

अमरावती ः पायदळ जाताना मोबाईलवर बोलणाऱ्या युवक, युवतीचे मोबाईल जबरीने हिसकावून पळणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यात चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे. शहरातील सात ते आठ गुन्ह्यांची कबुली त्या दोघांनी दिली.

शुभम तायडे (वय 19), राजिक शहा रशीद शहा (वय 29 रा. दर्यापूर) अशी अटक दोघांची नावे आहेत, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. राजापेठ, बडनेरा आणि गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये दीड महिन्यात, रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणारी व्यक्ती बेसावध असल्याचे बघून त्यांचे मोबाईल हिसकावण्याच्या सहा ते सात घटना घडल्या.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

 ही टोळी राजापेठ पोलिसांच्या हाती लागली. शुभम आणि राजिक हे दोघे गुन्हा करताना स्पोर्ट बाईकचा वापर करीत होते. मोबाईल हिसकावल्यानंतर ते कुणालाही बेभाव विकून आलेल्या पैशात मौज करीत होते. या प्रकरणात गुरुवारी (ता. आठ) रात्री शुभम, राजिकसह त्यांच्या सोबत नेहमी राहणारे, सोबत गप्पा करणारे अन्य दोघे अशा चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी शुभम आणि राजिकला अटक केली. त्याच्या दोन साथीदारांचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा राजापेठ पोलिसांनी केला. 

त्या दोघांना शुभम व राजिकसोबत चौकशीसाठी सुरुवातील ताब्यात घेतले होते. त्यातील एकजण महिला पोलिस शिपायाचा मुलगा आहे. परंतु त्या दोघांचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. अटकेतील शुभम व राजिक कडून गुन्ह्यातील काही मोबाईल जप्त केले. दोघांनाही राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी (ता. नऊ) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांनाही गुरुवारपर्यंत (ता. 15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनेतही सहभागी असल्याची शक्‍यता पोलिस पडताळून बघत आहेत.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

लूटमारीच्या पैशातून मौज

लूटलेले मोबाईल बेभाव विकल्यावर आलेल्या पैशातून मौज करण्याचा सपाटा शुभम, राजिकने सुरू केला होता. त्या दोघांकडून विविध ठाण्याच्या हद्दीतील लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता, पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested thieves gang who theft mobiles of pedestrians