तलवारी, भाले, लोखंडी रॉड होते त्या दरोडेखोरांजवळ! पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

सर्व आरोपी शाहुनगर परिसरात  मंगळवारी रात्री 11.35 च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्या भागातून पॅट्रोलिंग करीत असताना या सातजणांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या.

नागपूर : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत सगळ्यांचे खिसे रिकामे झाले आहेत. चोर-दरोडेखोरांचेही धंदे बसले आहेत कारण लॉकडॉनमुळे सगळे नागरिक घरी आहेत. या काळात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. कारण ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. मात्र आता चोर-दरोडेखोरांनीही आपले धंदे पुन्हा सुरू केल्याचे नुकतेच एका घटनेवरून लक्षात आले.

या काळात नागरिकांचे व्यवहार ठप्प असले तरी पोलिस आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. उलट पोलिसांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. त्याचाच परिणाम असा की दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना हुडकेश्‍वर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मात्र, एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रोशन अशोकराव काटोले (23) रा. सौभाग्यनगर, रुचीत कृष्णराव कडू (27), अक्षय ऊर्फ दत्तू राजेश बाळबुधे (20), यश लक्ष्मीप्रसाद भोयर (20) तिन्ही रा. म्हाळगीनगर, साहिल ऊर्फ दही दिर्घेश्वार दहिसर (19) रा. इंद्रनगर, नरसाळा आणि सागर ऊर्फ पिचकारी राजेंद्र महात्मे (27) रा. ब्रह्मनगर यांना अटक करण्यात आली. त्यांचा सातवा साथीदार प्रवीण ऊर्फ चुटी चव्हाण (23) रा. दुबेनगर हा पळून गेला.

सविस्तर वाचा - कोरोनाचा वार, नागपुरात पाच वस्त्या सील

सर्व आरोपी शाहुनगर परिसरात  मंगळवारी रात्री 11.35 च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्या भागातून पॅट्रोलिंग करीत असताना या सातजणांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे तलवार, भाला, कटयार, मिरची पूड, नायलॉन दोरी, लोखंडी रॉड आदी मुद्देमाल होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. एकाचा शोध सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police caught the six robbers