हवालदारानेच लुटला पोलिसांचा खजिना, सेवानिवृत्तीच्या दिवशी गुन्हा दाखल

Police constable stolen Rs 16 lakh material in police treasury
Police constable stolen Rs 16 lakh material in police treasury

नागपूर  ः सक्करदरा पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराने ठाण्यातील पोलिसांचाच खजिना (मालखाना) लुटला. हवालदाराने चक्क खजिन्यातील १६ लाखांचा ऐवज लंपास केला. रामचंद्र टाकळखेडे असे आरोपी हवालदाराचे नाव आहे. हवालदाराच्या सेवानिवृत्तीच्याच दिवशीच हा गुन्हा दाखल करण्यात आला हे विशेष. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र टाकळखेडे हे सक्करदरा पोलिस ठाण्यात २०१२ पासून कार्यरत होते. त्यांच्याकडे तेथील मालखान्याची जबाबदारी होती. त्यांनीही कधीही दुसरी नोकरी केली नाही. गेल्या आठ वर्षांत विविध कारवाईंमध्ये जप्त करण्यात आलेली मालमत्ता मालखान्यात जमा होती. यादरम्यान त्याने मालखान्यात जमा करण्यात आलेले दागिने व रोख स्वत:च्या फायद्याकरिता लंपास केली. 

दरम्यान परिमंडळ चारची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर काम करणाऱ्यांची बदली करण्यात यावी किंवा त्यांचे काम बदलण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानंतर टाकळखेडे यांच्याकडून मालखान्याची जबाबदारी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपवण्यात येणार होती. त्याकरिता आजवर जमा करण्यात आलेली मालमत्ता व त्याचा हिशेब घेत असताना अनेक व्यवहारात तफावत दिसली. 

गेली महिनाभर चौकशी करण्यात आली असता १६ लाखांचा मुद्देमाल कमी दिसला. हा मुद्देमाल परत करण्यासाठी त्याला संधी देण्यात आली. पण, तो केवळ वेळकाढूपणा करीत होता. शेवटी सोमवारी पोलिसांनी शासकीय जबाबदारी सांभाळताना संपत्तीचा अपहार करणे व फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच तो पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.

चौकीदाराचे हातपाय बांधून चोरल्या गायी

नागपूर ः कोराडीतील एका शेतात झोपलेल्या चौकीदाराचे हातपाय बांधून चोरट्यांनी सहा गायी चोरून नेल्या. ही घटना आज बुधवारी पहाटे तीन वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोराडीदेवी मंदिर मार्गावर चेतन कुंभरकर यांचे शेत आहे. शेतावर पुरुषोत्तम दयासम दिहारे (वय ५८ वर्षे, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) हे रखवालदार आहेत. ते शेतामधील घरात झोपले असता कुत्र्यांचा आवाज आल्याने बाहेर आले असता २५ ते २८ वर्षे वयोगटातील तीन युवक त्यांना दिसले. त्यापैकी एकाने पुरुषोत्तमचे हातातील काठी हिसकावून घेतली व पायावर मारली. दुसऱ्‍याने चाकूचा धाक दाखविला. तर तिसऱ्याने त्यांचे हातपाय बांधले. दरोडेखोरांनी शेडमध्ये बांधलेल्या ६ गायी (किंमत १ लाख १५ हजार) चोरून नेल्या. 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com