३६ जुगाऱ्यांना अटक; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय

अनिल कांबळे
Thursday, 15 October 2020

अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ‘ईगल इन रिसॉर्ट’ नावाने पॉश रिसॉर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती. तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते.

नागपूर : कोंढाळीतील ‘ईगल इन रिसॉर्ट’मध्ये सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात तब्बल ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ‘ईगल इन रिसॉर्ट’ नावाने पॉश रिसॉर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती. तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते. रात्री-बेरात्री या रिसॉर्टवर होणारी गर्दी पाहता स्थानिक गुन्हे शाखेला संशय आला. 

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या
 

त्यामुळे या रिसॉर्टमध्ये होणाऱ्या हालचालींवर पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांनी बारीक लक्ष ठेवले. गेल्या तीन दिवसांपासून अनेक कार नियमितरीत्या येत असल्याचे आढळले. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिसॉर्टवर छापा घातला. 

या छाप्यात ३६ आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना बघून आरोपींनी पळापळ केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १४ महागडे फोन, ८ कार आणि अडीच लाख रुपये नगदी असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid on Eagle in Resort in Kondhali