esakal | बस आटा गिला होता हैं, दवा दुश्वार है; सहा महिन्यांपासून हात रिकामेच
sakal

बोलून बातमी शोधा

porters have not been working at the railway station for six months

कोरोनाने सर्वच क्षेत्रांवर संकट ओढवले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची तर पुरती वाताहत झाली आहे. रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावरील भार स्वतः घेणाऱ्या कुली बांधवांनाही या महामारीचा मोठा फटका बसला आहे. २३ मार्चपासून देशभरातली नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंद आहेत.

बस आटा गिला होता हैं, दवा दुश्वार है; सहा महिन्यांपासून हात रिकामेच

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर :  कोरोना संकटामुळे रेल्वेचा अभिन्न भाग असलेल्या कुलींचे हात गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास रिकामेच आहेत. विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्यापासून त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, पुरेसे प्रवासी नसल्याने १२ -१२ तास ठाण मांडूनही जेमतेम मिळकत हाती पडते. हाती पडणाऱ्या मिळकतीतून ‘बस आटा गिला होता है, बाल बच्चोके दाल रोटी का इंतजाम हो जाता है. पर, महामारी मे दवा का इंतजाम करना अभी दुश्वार ही है’, ही कैफियत आहे नागपूर रेल्वे स्थानकावरील कुलींची.

कोरोनाने सर्वच क्षेत्रांवर संकट ओढवले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची तर पुरती वाताहत झाली आहे. रेल्वे प्रवाशांच्या डोक्यावरील भार स्वतः घेणाऱ्या कुली बांधवांनाही या महामारीचा मोठा फटका बसला आहे. २३ मार्चपासून देशभरातली नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंद आहेत. लॉकडाऊन दरम्यान मोजक्याच प्रवासी गाड्या चालविण्यात आल्या. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर गाड्यांची संख्या वाढवली गेली खरी पण प्रवाशांचीच संख्या कमी असल्याने कुलींची जीवनगाडीच थांबलेल्या अवस्थेत आहे. 

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर
 

नागपूर रेल्वेस्थानकावर जवळपास दीडशे कुली असून १४५ कामावर असतात. कोरोना संकटात कामच बंद झाल्याने राजस्थान आणि बिहारचे जवळपास शंभर कुली गावी निघून गेले. ४५-५० कुली स्थानिक आहेत. विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतर प्रारंभी १० जणच काम करीत होते.

गाड्यांची संख्या वाढल्यापासून ४० ते ४५ कुली दररोज दोन सत्रात कामावर येत आहेत. १२-१२ तास वाट बघूनही एखादच ग्राहक मिळतो. त्यातून दीड-दोनशे हाती पडतात. त्यातच संपूर्ण कुटुंबाची गुजराण करावी लागते. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे अधिकाऱ्यांनी संस्थांकरवी धान्याचे किट मिळवून दिले. पण, इतर खर्चासाठी भविष्यासाठी गोळा केलेली पुंजी आटली. 

आता किट मिळणेही बंद झाले. अशात रोजचा खर्च भागविणे तारेवरची कसरत झाली आहे. केवळ भूकबळीपासून वाचलो आहोत. संपूर्ण मिळकत जेवणारच खर्च होते. एक दमडी वाचत नाही. कुणाची प्रकृती बिघडल्यात दवाखान्यात जायलाही जवळ पैसे नाहीत. हीच अवस्था प्रिपेड ऑटोचालक, बुटपॉलिश करणारे, छोट्या वेंडर्सचीही आहे.


कुलींना अर्थसाहाय्य करावे
सहा महिन्यांपासून घरी बसणे मोठी बाब आहे. रेल्वेचा भाग असल्याने रेल्वे प्रशासनाने अडचणीच्या काळात कुलींना अर्थसाहाय्य करणे आवश्यक आहे. प्रीपेड बुथचे ऑटोचालकही आज केवळ धक्केच खात आहे. या घटकांना शासन-प्रशासनाने मदत द्यावी.
- अब्दुल माजीद, अध्यक्ष मध्य रेल्वे भार वाहक संघ. 


संपादन  : अतुल मांगे