ताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही; असे का म्हणाले प्रफुल्ल पटेल?

राजेश चरपे
Tuesday, 20 October 2020

जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढली होती. सत्ता आल्यावर काँग्रेस बदलली. एकही सभापतीपद देण्यास नकार दिला. पर्याय नसल्याने राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली. मात्र, यापुढे असे घडू नये यासाठी आपणासही ताकद दाखवावी लागेस असे पटेल म्हणाले.

नागपूर : ताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही. मात्र, त्यासाठी आधी स्वतःला ताकद दाखवावी लागते. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दहा-बारा जागांवर राष्ट्रवादी समाधान मानणार नाही, असा इशारा काँग्रेसला देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यादृष्टीने उमेदवार तयार करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला तब्बल बावीस वर्षे झाली. विदर्भात पक्षाची ताकद वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे. महाआघाडीतील प्रमुख पक्षाचा नागपूर महापालिकेत फक्त एक नगरसेवक निवडूण येतो ही लाजिरवाणी बाब आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाआघाडी कायम राहावी याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. मात्र, सन्मानच मिळणार नसेल तर वेगळी भूमिका घ्यावीच लागले, असेही पटेल म्हणाले.

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढली होती. सत्ता आल्यावर काँग्रेस बदलली. एकही सभापतीपद देण्यास नकार दिला. पर्याय नसल्याने राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली. मात्र, यापुढे असे घडू नये यासाठी आपणासही ताकद दाखवावी लागेस असे पटेल म्हणाले. राष्ट्रवादीची बैठक बिजलीघरच्या हिरवळीवर घेण्यात आली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे सर्वच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

ती माझी चूक

विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरात किमान एक तरी जागा मिळावी यासाठी आपण आग्रही होतो. मात्र, काँग्रेसने शेवटपर्यंत झुलवले. मी गोंदियाला जाताच चित्र बदलले. राष्ट्रवादीला एकही जागा दिली नाही. त्यावेळी माझी चूक झाली अशी कबुलीची पटेल यांनी दिली. राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त आहे, असे निदर्शनास आणून देऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे आपण मोठा भाऊ असल्याचे यावेळी सूचित केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praful Patel says NCP wants a place of honor