स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता प्रिती पोलिसांच्या पाठबळाने झाली 'ब्लॅकमेलर'; वाचा सविस्तर...

अनिल कांबळे
रविवार, 7 जून 2020

लकडगंज भागात राहणारे मेस संचालक सुनील पौनिकर यांना सतीश याने व्याजाने पैसे दिले होते. व्यवसाय बुडाल्याने सुनील हे सतीश याला पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे सतीश हा सुनील यांच्यासोबत वाद घालायला लागला. याचदरम्यान सतीश याची प्रितीसोबत ओळख झाली. पाचपावली व लकडगंजमधील पोलिस अधिकाऱ्यासांसोबत ओळख असल्याचे सांगून प्रितीने सतीश याला पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

नागपूर : नागपूर शहरातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत असलेली मैत्री आणि त्यांच्यासोबत वॉट्‌सऍपवर केलेल्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट दाखवून तथाकथित समाजसेविका प्रिती दास अनेकांना ब्लॅकमेल करीत होती. तिच्याविरुद्ध कुणी तक्रार करायला गेल्यास पोलिस अधिकारी तिला वाचवित होते, अशी चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. प्रिती दास व साथीदारांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या प्रिती फरार आहे. पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. सतीश सोनकुसरे व मंगेश पौनिकर अशी गुन्हा दाखल केलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती दास ही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता होती. ती पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून वसुली, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग करीत होती. प्रितीवर आतापर्यंत अनेक खंडणीसह फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तिने दिलेल्या धमक्‍यांमुळे अनेकांनी गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखविली नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - मुलींच्या वसतिगृहांच्या इमारतीत चालतयं तरी काय?

लकडगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज भागात राहणारे मेस संचालक सुनील पौनिकर यांना सतीश याने व्याजाने पैसे दिले होते. व्यवसाय बुडाल्याने सुनील हे सतीश याला पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे सतीश हा सुनील यांच्यासोबत वाद घालायला लागला. याचदरम्यान सतीश याची प्रितीसोबत ओळख झाली. पाचपावली व लकडगंजमधील पोलिस अधिकाऱ्यासांसोबत ओळख असल्याचे सांगून प्रितीने सतीश याला पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रिती ही पोलिसांना घेऊन सुनील यांच्या घरी गेली. 

सुनील यांच्या पत्नीला धमकी दिली. सुनील यांच्या घराची झडती घेतली. सुनील यांनी नोव्हेंबरला विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रिती, सतीश व तिच्या साथीदारांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे सुनील यांनी मृत्युपूर्वी बयाणात सांगितले होते. मात्र, लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. आता लकडगंज पोलिसांनी प्रिती व साथीदारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रिती ही फरार आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.

अधिक माहितीसाठी - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

अधिकाऱ्यांची 'खास' होती प्रिती

फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस ठाण्यामध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. या ओळखीचा फायदा घेत ती ब्लॅकमेल करायची. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. 

सामाजिक कार्यकर्त्या रडारवर

प्रिती दाससारख्या स्वयंघोषित असलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्या शहरातील अनेक पोलिस ठाण्यातील नवनियुक्‍त ठाणेदारांना पुष्पगुच्छ घेऊन भेटायला जातात. त्यांच्यासोबत फोटो काढून वस्तीत सेक्‍स रॅकेट, लॉज, हॉटेल्स, ऑटो-टॅक्‍सी आणि खाणावळी संचालकांकडून पैसे वसुली करतात. तसेच राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून पोलिसांवरही इम्प्रेशन टाकतात. पोलिस ठाण्यात "सेटिंग' करून अनेक प्रकरणे दाबण्यात यांचा हातखंडा असतो. अशा सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिस थारा देत असल्यामुळे त्या ब्लॅकमेलर बनत असल्याची चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preeti Das became a blackmailer due to the support of the police