"लुटेरी दुल्हन' प्रीती दास गजाआड होताच टोळीवर आली ही वेळ... 

अनिल कांबळे 
मंगळवार, 16 जून 2020

प्रीती दासने आपला "जलवा' दाखवून अनेक राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लाखोंनी लुटल्याचे समोर आले आहे.

नागपूर :  "चाची 420' आणि "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासने टोळी तयार केली होती. ती टोळीसह गुन्हेगारी कारवायांमध्ये लिप्त होती. तिचे गुन्हेगारी पाप उघडकीस आल्यानंतर तिच्यावर मोक्‍का कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तिचे पंटर डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारिक ट्रेलर हे सर्व अंडरग्राउंड झाल्याची चर्चा शहरभर आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळ'ला दिलेल्या माहितीनुसार, प्रीती दासने आपला "जलवा' दाखवून अनेक राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लाखोंनी लुटल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रीतीकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याने इभ्रतीचा "भाजीपाला' होऊ नये म्हणून कोणताही राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकारी प्रीतीच्या ब्लॅकमेलिंगबाबत शब्दही बोलायला तयार नसल्याचे समजते. 

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

प्रीती दासवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे, पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि भंडारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. प्रीती दासने गंडा घालण्यासाठी तसेच वसुली करण्यासाठी डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारीर ट्रेलर अशी गॅंग बनविली होती. या टोळीने आतापर्यंत शेकडो धनिकांना जाळ्यात ओढून खंडणी स्वरूपात लाखो रुपये उकळले. प्रीती दासची टोळी गुन्हे दाखल होईपर्यंत तिच्यासोबत होती. मात्र, आता पोलिसांनी प्रीतीवर मोक्‍का लावण्याची तयारी केल्याने टोळीतील सर्व पंटर अंडरग्राउंड झाल्याची चर्चा आहे. 
 

तक्रारींचा ओघ वाढणार

 ताजबागमधील तौफिक नावाचा युवक प्रीतीने फेकलेल्या जाळ्यात अडकला होता. त्याला तिने लाडीगोडी लावली. महिंद्रा बॅंकेतील मॅनेजर खास मित्र असल्याचे सांगून त्याला कर्ज मिळवून देण्याचे आमिष प्रीतीने दाखवले. त्याच्याकडून प्रीतीने 50 हजार रुपये उकळले. मात्र, एका सहकारी बॅंकेतील मॅनेजरची भेट करून दिली. कर्ज मंजूर न झाल्याने तौफिकने प्रीतीला पैसे मागितले असता तिने खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. प्रीतीने अशा अनेकांची फसवणूक केली. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रीतीविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढणार आहे. 
 

प्रीतीच्या महागड्या साड्या

 पाचपावली पोलिसांनी प्रीती दासच्या एका घराची झडती घेतली. प्रीतीच्या कपाटात असलेल्या महागड्या साड्या बघून पोलिसही चक्रावले. कोणताही व्यवसाय किंवा नोकरी न करणाऱ्या प्रीतीकडे एवढ्या महागड्या साड्या आणि फॅन्सी ड्रेस आले कुठून? असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. तसेच प्रीतीने कोटींची माया नातेवाईक, टोळीतील मैत्रिणी आणि अमितच्या नावावर केल्याचे समजते. 
 
अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"
 

लकडगंज प्रकरणात मिळाला जामीन 

पौनीकर या युवकाच्या पत्नीला देहव्यापारात ढकलून धंदा करवून पैसे काढण्याची धमकी प्रीतीने दिली होती. अपमान सहन न झाल्याने पौनीकरने आत्महत्या केली. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यानंतर प्रीतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला होता. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना प्रीती दासला लगेच जामीन मिळाल्याने पोलिस आणि सरकारी वकिलाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लकडगंज पोलिस "मॅनज' झाल्याची चर्चा शहरभर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preeti Das's Nagpur gang is underground