कोरोना कुणालाही होऊ शकतो. परंतु मृत्यूच होतो हे मनातून काढून टाका...

to prevent corona counseling is important
to prevent corona counseling is important

नागपूर : कोरोनामुळे शहरात दररोज पन्नासावर नागरिकांचा मृत्यू होत आहे. आजूबाजूने कोरोनाबाधित, एखादवेळी कोरोनाबळीही दिसून येतो. त्यामुळे अनेक जण कोरोनाची धास्ती बाळगत असून, यातूनही न कळत बाधित मृत्यूच्या दारापर्यंत जात असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आता कोरोनाबळी रोखण्यासाठी बाधितांचे समुपदेशनही महत्त्वाचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांनी कोरोनामुळे मृत्यू होतोच हा विचारच टाळण्याची गरज व्यक्त केली. शहरात कोरोनाबळींची संख्या १६०० पर्यंत पोहोचली. त्यामुळे आता बाधितांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. उपचार घेणारे अनेक जण दुबळ्या मानसिकतेतूनही कोरोनाचे बळी ठरत असल्याची चर्चा रंगली आहे. यात तरुणाईची संख्या अधिक असल्याचे समजते.

कोरोनाचा उपचार करताना १४ दिवसांचा कालावधी लागत असल्याने एकीकडे नोकरीतून काढल्या जाण्याच्या भीतीने अनेकांत नैराश्य पसरले. यात आता कोरोनामुळे मानसिक तणावात आणखीच भर पडत आहे. परिणामी कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, ही नकारात्मक भावनाही अनेकांच्या मनात घर करीत आहे.

यातून बाहेर काढण्यासाठी बाधितांचा मित्र किंवा नातेसंबंधातील कणखर व्यक्ती त्याचा मोठा आधार ठरण्याची शक्यता आहे. मानसिकरीत्या खचलेल्या बाधिताला धीर देत कोरोनानंतरचे आयुष्य सुंदरच नव्हे तर आश्वासक असल्याचे दाखवून दिल्यास कोरोनाची भीती दूर होण्यास मदत होईल, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नवखरे यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले.

कोरोना झाल्यानंतर लगेच चार-पाच दिवसांत नैराश्य तयार होत नाही. पूर्वीपासूनच कामाचा किंवा इतर समस्यांचा ताण असेल तरच नैराश्य वाढू शकते, असे ते म्हणाले. कोरोना कुणालाही होऊ शकतो, असे समजून घेणे आवश्यक आहे. परंतु, मृत्यूच होतो, हे मनातून काढून टाका, असा सल्लाही त्यांनी दिला. 

गृहविलगीकरण धोक्याचे 
पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच उपचार घेण्याचे सांगितले जात आहे. ते धोक्याचे आहे. गृहविलगीकरणातील बाधितांवर देखरेख कोण ठेवणार? बाधिताला नेमके काय करावे ते कळत नाही. त्यांना घरी योग्य सल्ला मिळत नाही. प्रत्येक तीन दिवसांनी एकूणच आरोग्याची तपासणी कोण करणार, असे प्रश्न आहेत, असे डॉ. नवखरे म्हणाले.

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com